breaking-newsराष्ट्रिय

अॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन

‘ए भय्या ठीकसे तोलो’ म्हणत भाजी घेणाऱ्या ललिताजी किंवा धबधब्याखालची ‘लिरिल गर्ल’ ही काल्पनिक पात्रे घराघरांत आणि अक्षरश: मनामनांत पोहोचवणाऱ्या जाहिराती करणारे अ‍ॅलेक पदमसी यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे. अॅलेक पदमसी यांच्या जाण्याने जाहिरात क्षेत्रातील मोठं नाव काळाच्या पडद्याआड गेले आहे. हमारा बजाज, सर्फ, लिरील गर्ल यासारख्या प्रसिद्ध जाहिराती त्यांनी केल्या आहे.

सातव्या वर्षी ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकातून अॅलेक पदमसी यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले. आतापर्यंत त्यांनी सत्तर नाटके केली आहेत. त्यात इंग्रजी व हिंदी नाटकांचा समावेश आहे. त्याशिवाय जाहिरात आणि सिने क्षेत्रातही आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवला आहे. ‘गांधी’ या सिनेमात त्यांनी बॅ. जिना यांची भूमिका साकारली होती. शेक्सपिअर आर्थर मिलर, प्रताप शर्मा, गिरीश कार्नाड, विजय तेंडुलकर, इस्मत चुगताई अशा नाटककारांची नाटकेही त्यांनी केली आहेत.

चंगळवाद आणि ‘ब्रँड-सजगता’ कमी असलेल्या त्या ४० वर्षांपूर्वीच्या काळात १०० हून ब्रँड ‘लिंटास’ने उभे केले होते आणि या साऱ्यामागे कल्पनाशक्तीपासून सादरीकरणाच्या तपशिलांपर्यंत पदमसींचा मेंदू आणि हात चालत असे. लिंटास वाढू लागल्यावर अनेक तरुणांमधील गुण हेरून त्यांनी या गुणांना मुक्त वाव दिला.. किंवा किमान त्या तरुणांना मुक्तच वाटेल, आपण त्यांना मार्गदर्शन वगैरे करतो आहोत हे कळणारही नाही- अशी काळजी घेतली!

मुक्तपणा, काहीसा बेछूटपणाच कल्पनांसाठी आवश्यक असतो.. विचार मात्र बांधीव असायला हवेत.. एवढं पथ्य पाळायला पदमसी सांगत. त्या वेळी कुणाला हे कळत नसेलच, तर आज पदमसी यांच्या जगण्याकडे पाहून कळावे. ‘जीझस ख्राइस्ट सुपरस्टार’ किंवा ‘एव्हिटा’सारख्या इंग्रजी संगीतिका (म्युझिकल्स), ‘रोशनी’ हे १९८० च्या दशकातच ‘ऑनर किलिंग’सारख्या विषयांना स्पर्श करणारे आणि एका ग्रामीण पंजाबी मुलीच्या फुलण्याची कथा सांगणारे संगीतमय इंग्रजी नाटक.. अशा देशी-विदेशी विषयांमधले नाटय़ त्यांनी मांडले. चमकदारपणा हा प्रेक्षकाला आकर्षून घेणारा गुण आहेच, पण या ‘स्पेक्टॅकल’पेक्षा कथा आणि अभिनय महत्त्वाचा, हे त्यांच्या नाटकांत काम करणाऱ्या अनेकांवर त्यांनी ठसविले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button