breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेतील टाळेबंदीचा पेच नववर्षांपर्यंत?

  • अंशत: टाळेबंदीचा आठ लाख संघराज्य कर्मचाऱ्यांना फटका

अमेरिकेतील टाळेबंदीचा पेच नवीन वर्षांपर्यंत चालू राहण्याची शक्यता असून रिपब्लिकन व डेमोक्रॅट यांच्यात यावर कुठलाही तोडगा गुरुवारी निघू शकला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी विधेयकातील तरतुदीपेक्षाही जादा रकमेचा हट्ट धरून बसले आहेत.

ट्रम्प यांनी तूर्त खर्चासाठीची तरतूद करण्याच्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला असून बेकायदेशीर स्थलांतरितांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत बांधणे आवश्यक आहे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. डेमोक्रॅट सदस्यांचे अमेरिकी प्रतिनिधीगृहात २०१९ रोजी बहुमत होणार आहे. सिनेटमध्ये डेमोक्रॅट्सचे फारसे प्रतिनिधी नसले तरी त्यांची संख्या पुरेशी आहे. डेमोक्रॅट्सच्या मते सीमेवर अशा प्रकारची भिंत बांधणे हे करदात्यांच्या पैशाचा अपव्यय आहे. दोन्ही पक्षांनी काल निवेदने जारी केली असून पुढील वर्षांपर्यंत टाळेबंदी सुरू राहण्याची चिन्हे आहेत.

शनिवारी अंशत: टाळेबंदीत आठ लाख संघराज्य  कर्मचाऱ्यांना फटका बसला असून त्यांना पगाराविना काम करावे लागले किंवा रजेवर जावे लागले. अध्यक्ष ट्रम्प यांनी टाळेबंदीचे खापर डेमोक्रॅट्सवर फोडले असून टाळेबंदी व सीमेवर भिंत बांधण्याचा काही संबंध नाही असे त्यांनी म्हटले आहे.

डेमोक्रॅट्स सदस्यांना डोनाल्ड ट्रम्प  व रिपब्लिकनांना जिंकू द्यायचे नाही एवढाच त्यांचा हेतू आहे, असे सांगून ट्रम्प म्हणाले की, सीमेची सुरक्षा हा खरोखर मोठा प्रश्न आहे. व्हाइट हाऊसच्या प्रसिद्धी सचिव सारा  सँडर्स यांनी गुरुवारी डेमोक्रॅट्सवर टीका केली असून या सदस्यांनी ख्रिसमसला टाळेबंदी सुरू असताना सुटीवर जाणे पसंत केले. त्यांनी वॉशिंग्टनमध्ये थांबून वाटाघाटी करायला हव्या होत्या.

अध्यक्ष ट्रम्प व त्यांचा चमू मात्र सुटीवर जाण्यापेक्षा पेच टाळण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये थांबला आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांच्या संरक्षणासाठी डेमोक्रॅटिक पक्ष देशाच्या विविध विभागांचे काम पैशांअभावी बंद पाडत आहे. डेमोक्रॅट्सनी यावर टीका करताना म्हटले आहे की, ही ट्रम्प यांनी निर्माण केलेली टाळेबंदी आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button