अमेरिकेचे अफगाणिस्तान समेटदूत भारतात येणार
- तालिबानी दहशतवादावर राजकीय तोडग्याचे प्रयत्न
वॉशिंग्टन – अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अफगाणिस्तानविषयक दूत झालमय खलिलाझाद हे सध्या पाकिस्तानाच चर्चा करीत असून ते भारतालाही भेट देणार आहेत. अफगाणिस्तानातील तालिबानी दहशतवादामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर राजकीय तोडगा काढण्यासाठी ते प्रयत्नशील असून खलिलाझाद हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत. अमेरिकी परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, भारत, चीन, अफगाणिस्तान व पाकिस्तान यांचे एक आंतरसंस्थात्मक शिष्टमंडळ तयार करून ८ ते २१ जानेवारी दरम्यान चर्चा केली जाईल, पण खलिलाझाद नेमके कुठल्या देशात कुठल्या दिवशी असतील हे ठरलेले नाही.
अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य माघारीची घोषणा केल्यानंतर आता त्याची अंमलबजावणी ही इतर अनेक देशांच्या सहकार्यावर अवलंबून आहे. खलिलाझाद हे आंतर अफगाण राजकीय तोडग्याच्या प्रक्रियेसाठी भारत सरकारच्याच नव्हे,तर उपरोल्लेखित सर्वच देशांच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. खलिलाझाद यांना अफगाणिस्तान समेटाचे दूत म्हणून गेल्या वर्षी नेमण्यात आल्यानंतर त्यांची ही पहिलीच भारत भेट आहे. त्यांनी इतर अनेक देशांना भेटी दिल्या असून ते भारतात पहिल्यांदाच येत आहेत. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना भारताने अफगाणिस्तानात केवळ वाचनालय बांधून दिले असे म्हटले होते. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असून भारताने अफगाणिस्तानला २००१ पासून ३ अब्ज डॉलर्सची मदत केली असून ११ सप्टेंबर २००१ मधील हल्ल्यानंतर तालिबानचा अमेरिकी सैन्याने पाडाव केला होता.