अमेरिका आमचा केवळ वापर करते – मुशर्रफ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/parvez-6.jpg)
इस्लामाबाद – अमेरिका पाकिस्तानचा केवळ हवा तसा वापर करते. जेव्हा त्यांना आमची जरूरी नसते तेव्हा ते आम्हाला वाऱ्यावर सोडून देतात. आता त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात भारताला जवळ करण्याचे धोरण अवलंबले आहे अशा शब्दात पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी अमेरिकेवर टीका केली आहे.
व्हाईस ऑफ अमेरिका या संस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले की पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील संबंध सध्या कमालीचे खालच्या पातळीवर गेले आहेत. मुशर्रफ सध्या दुबईत वास्तव्याला आहेत. ते म्हणाले की पाकिस्तानने अमेरिकेशी चर्चा करून आपसातील संबंध सुधारले पाहिजेत आणि या संबंधांमध्ये ज्या अडचणी आहेत त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत.
अमेरिकेने आता पाकिस्तानला वाऱ्यावर सोडून भारताशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न चालवला आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की या वाढत्या भारत-अमेरिका संबंधांमुळे आमच्यावर विपरीत परिणाम होतो आहे. अफगाणिस्तानच्या प्रश्नात भारताची भूमिका संशयास्पद असल्याची टिपण्णीही त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले की संयुक्तराष्ट्रांनी भारताच्या अफगाणिस्तानच भूमिकेची चौकशी करण्याची गरज आहे. अमेरिका आम्हाला कधी जवळ करते आणि नंतर मध्येच वाऱ्यावर का सोडते हा प्रश्न पाकिस्तानी जनतेलाही भेडसावतो आहे असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.