अमित शहांच्या वाहनावर आंध्रात दगडफेक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/amit-.jpg)
अमरावती – तिरूपतीच्या दर्शनावरून रेणुगुंठा येथील विमानतळावर परतणारे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात तेलगु देसम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज उग्र निदर्शने केली. यावेळी त्यांच्या ताफ्यातील एका वाहनावर दगडही मारण्याचा प्रकार घडला त्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंध्रप्रदेशला वेगळ्या राज्याचा दर्जा देणाऱ्या कायद्यात ज्या तरतूदी करण्यात आल्या आहेत त्याची पुर्तता करावी आणि आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी या कार्यकर्त्यांनी अमित शहांच्या विरोधात निदर्शने आयोजित केली होती. केंद्र सरकारने आंध्रप्रदेशची ही मागणी अमान्य केली आहे. त्यामुळे भाजपविषयी राज्यात असंतोष आहे त्याचेच पडसाद अमित शहांच्या या भेटीच्यावेळी उमटले.
या घटनेची माहिती मिळतात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना असे प्रकार पुन्हा न करण्याची तंबी दिली आहे. अशा प्रकारची बेशिस्त कोणाकडूनही खपवून घेतली जाणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. ही दगडफेक अज्ञात इसमांनी केल्याचे उपमुख्यमंत्री एन चिना राजप्पा यांनी म्हटले आहे. निदर्शकांनी फेकलेला एक दगड शहा यांच्या ताफ्यातील एका वाहनाला लागला. तथापी शहा यांच्या गाडीला कोणताही दगड लागलेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले. नंतर पक्षाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात या प्रकाराचा निषेध करण्यात आला आहे. आपला केंद्र सरकारशी विशेष राज्याच्या मागणीसाठी संघर्ष सुरू असला तरी त्यात हिंसाचाराला स्थान नाही असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणात भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. अमित शहा यांनी तिरूपतीच्या बालाजी मंदिरात आज सकाळी जाऊन दर्शन घेतले. आणि तेथून विमानतळावर परतत असताना हा प्रकार घडला.