अफगाण लष्कराने तालिबानच्या ताब्यातून कोहिस्तान केले मुक्त
काबुल (अफगाणिस्तान) – अफगाण लष्कराने तालिबानींच्या ताब्यात असलेले कोहिस्तान मुक्त केल्याची माहिती देण्यात आलेली आहे. गेल्या आठवड्यातच तालिबानने कोहिस्तानवर ताबा मिळवला होता. लष्कर आणि पोलीस दलाने हवाई दलाच्या मदतीने केलेली ही चढाई पूर्णपणे यशस्वी झाल्याची माहिती रविवारी प्रांतीय पोलीस प्रवक्ते सनाउल्ला रुहानी यांनी दिली आहे. कोहिस्तान हा जिल्हा उत्तरी बदखां प्रांतात आहे.
तेशकान जिल्ह्यातही अफगाण लष्कराने तालिबानला माघार घेण्यास भाग पाडले आहे. या भागातील रिकाम्या चौक्यांचा ताबा तालिबानींनी घेतला होता. अफगाण सैन्यांने या चौक्या पुन्हा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. मात्र या चकमकीत नेमके किती तालिबानी मारले गेले, याची माहिती देण्यात आलेली नाही.
दरवर्षीएप्रमाणे उन्हाळा सुरू होताच तालिबानींनी आपल्या कारवाया पुन्हा सुरू केल्या आहेत. शनिवारी कंधारचे पोलीसप्रमुख अब्दुल रज्जाक यांच्या घरावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. स्फोटकांनी भरलेला एक ट्रक अब्दुल रज्जाक यांच्या घरावर आदळवण्यात आला होता. या हल्ल्यात अब्दुल रज्जाक यांच्या घराचे मोठे नुकसान झाले असले, तरी अब्दुल रज्जाक आणि त्यांचे कुटुंबीय मात्र सुरक्षित आहेत. तालिबानशी जोरदार मुकाबला करणाऱ्या अब्दुल रज्जाक यांच्यावर यापूर्वीही असे हल्ले अनेक वेळा करण्यात आलेले आहेत.