अफगाणिस्तानात खाण खचून 30 ठार
काबुल- अफगाणिस्तानातील बादशहा खान प्रांतातील एक सोन्याची खाण खचून त्यात किमान तीस जण ठार झाल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना या प्रांतातील कोहीस्तान जिल्ह्यात घडली. या संबंधात माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की या खाणीच्या परिसरात सोन्याच्या शोधासाठी आजूबाजुच्या गावकऱ्यांनी सुमारे दोनशे मिटरचा खड्डा खणला होता व त्यात आणखी खोदाईचे काम केले जात असताना ही खाण खचली आणि वरून दगडमातीचा मोठा ढिगारा आत कोसळला. त्यावेळी तेथे काम करणारे किमान तीस जण त्याखाली दबून ठार झाले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की या खाणीत काम करणारे लोक आजुबाजुचे खेडूत होते. ते अनुभवी खाण कर्मचारी नव्हते. त्यामुळे त्यांनी अदांधुद पद्धतीने खाणीत खोदकाम केल्याने ही घटना घडली आहे. या भागातील खाणींवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. सोन्याच्या शोधासाठी तेथील नागरीकच अशा खाणी खोदत असतात अशीही माहिती मिळाली आहे.