ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

अमोल कोल्हे यांनी करून दाखवल, लोकसभा निवडणुकीत मिळवला विजय

अजित पवारांचं आव्हान स्वीकारलं

मुंबई : ज्या निर्णयाची संपूर्ण जनता आतुरतेनं वाट बघत होती तो दिवस आज आला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होतोय तर काही भागात अजून मतमोजणी सुरु आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना सातव्या फेरीला ५३९४९ मतांची आघाडी मिळाली होती. मात्र, आता निकालाअखेर त्यांचा विजय झालेला आहे.

अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु करताच सर्व कार्यकर्त्यांनी फटाके उडवून जल्लोष केला. अमोल कोल्हे १ लाख ३० हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाचा सर्वात मोठा फटका अजित पवारांना बसला आहे. लोकसभा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कसा निवडून येतो ते बघतोच, असं आव्हान अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना दिलं होतं. लोकसभा निवडणुकीत अमोल यांनी विजय मिळवला. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. त्यामध्ये शरद पवार यांच्या गटाकडून अमोल कोल्हे यांना खासदारकीची संधी देण्यात आली. अमोल यांनी अजित पवारांचं आव्हान स्वीकारलं.

अमोल कोल्हे भरघोस मताने विजयी झाले त्यामुळे त्यांचा आनंद शिगेला पोहोचला आहे. विजयानंतर अमोल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये अनेक छोटे छोटे व्हिडिओ घेतले आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम अजित पवारांचं अमोल कोल्हेंना दिलेलं आव्हान, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य आहे. या व्हिडिओला अमोल यांनी, ‘आव्हान सोपं नव्हतं…दिल्लीतून महाराष्ट्रावर झालेला हल्ला अन् त्यांना लाभलेली काही आपल्याच माणसांची साथ… हे सगळं महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला लालकरणारं होतं. मात्र… आलं अंगावर, घेतलं शिंगावर याप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली, महाविकास आघाडीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी बळ दिलं आणि शिवजन्मभूमीच्या सर्व निष्ठावान मावळ्यांनी निकराचा लढा दिला.हा विजय मी शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाविकास आघाडीच्या सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांना समर्पित करतो!’ असं कॅप्शन दिलंय. त्यांच्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी कमेंट्स करत अभिनंदन केलंय. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे शंतनू मोघे यांनी ‘अभिनंदन…ये तो होनाही था’ अशी कमेंट करत अमोल यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कोण आहेत अमोल कोल्हे?
डॉ. अमोल कोल्हे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे झाला. त्यांनी बारावीपर्यंतचं शिक्षण पुण्यामध्ये घेतलं. मुंबईमध्ये सेठ गोवर्धनदास सुंदरदास महाविद्यालयातून एम. बी. बी. एस झाल्यानांतर त्यांनी पुण्यात डॉक्टरची प्रॅक्टिससुद्धा केली. त्यानंतर अमोल अभिनयक्षेत्राकडे वळले. त्यांनी अनेक नाटक, मालिकांमध्ये काम केलं. मात्र, झी मराठी वाहिनीवरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली.

२०१४ च्या निवडणुकांपूर्वी अमोल कोल्हेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, २०१९ च्या निवडणुकीपूर्वी अमोल कोल्हे यांनी सर्वांनाच हादरवून टाकलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं अमोल यांना शिरूर मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आणि पक्षाने दाखवलेला विश्वास कायम राखून ते विजयी झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button