संजोग वाघेरे आणि उद्धव ठाकरेंची भेट; अजित पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला
पिंपरी : पिंपरी- चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला आहे. मात्र, याच बालेकिल्ल्यात अजित पवारांना एक मोठा धक्का बसत असल्याचं समोर येत आहे. राष्ट्रवादीचे माजी महापौर आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे हे शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. यावरून आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, राजकारणात कोण कोणाच्या भेटी घेतो हे राजकारणात पहिल्यापासूनच आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या पक्षातून उमेदवारी कोणाला मिळेल याची चाचपणी एखाद्याने केली असेल. काही जाणांना खासदार व्हायचं आहे. या पक्षात तिकीट नाही मिळालं तर त्या पक्षात तिकीट मिळेल का? या हेतूने काही जण गेले असतील.
हेही वाचा – ‘उद्धव ठाकरेंना अक्कल नाही’; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची टीका
माझं त्यांच्यासोबत काही संभाषण झालेलं नाही. संजोग वाघेरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो मी एकत्र बघितलेला आहे. संजोग वाघेरे सोबत याबाबत मी चर्चा करणार आहे. प्रत्येकाला व्यक्ती आणि मत स्वातंत्र्य आहे. महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसल्याने ते आता अशा प्रकारे वेगवेगळ्या पक्षातील उमेदवार घेत आहेत, असा टोलाही अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.