breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

“अजित पवारांना महायुतीत एकटं पाडलं जातंय”, मिटकरींचा आरोप

Amol Mitkari : अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडून आगामी विधानसभा निवडणुकीला एकट्याने सामोरं जावं यासाठी महायुतीतील काही लोक प्रयत्न करत असल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील आमदार (विधान परिषद) अमोल मिटकरी म्हणाले, “महायुतीत गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना पाहिल्या तर लक्षात येईल की अजित पवारांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. आता विधान परिषदेच्या निवडणुका आहेत. नाशिकमध्ये त्यांनी (महायुती) आम्हाला पाठिंबा देण्याऐवजी शिवसेनेच्या ठाकरे गटाला पाठिंबा दिल्याचं आम्हाला समजलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अजित पवारांवर केलेली टीका, परवा (२० जून) शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी आमच्या पक्षाबाबत केलेलं वक्तव्य, या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर असं लक्षात येतंय की महायुतीत आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

अमोल मिटकरी म्हणाले, “माझी महायुतीमधील नेत्यांना विनंती आहे की त्यांनी अजित पवारांना एकटं पाडण्याचा प्रयत्न करू नये. आमचे वरिष्ठ मला नेहमी ताकीद देत असतात, मी ती ताकीद ऐकतो, परंतु याचा अर्थ असा नाही की कोणीही यावं आणि आम्हाला बोलावं. हे खपवून घेतलं जाणार नाही.” मिटकरी यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी त्यांनी महायुतीवरील संताप व्यक्त केला.”

हेही वाचा – लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित, सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर निर्णय!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने आगामी विधानसभेला महायुतीपासून विभक्त होऊन निवडणूक लढावी, यासाठी प्रयत्न चालू आहेत का? असा प्रश्न विचारल्यावर अमोल मिटकरी म्हणाले, “काही लोकांचे असेच प्रयत्न आहेत. अजित पवार यांनी महायुतीत राहू नये यासाठी त्यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजित पवारांनी स्वतःहून महायुतीपासून वेगळं व्हायला हवं, यासाठी अजित पवार आणि आमच्या पक्षाला मानसिक त्रास दिला जातोय. आमच्या पक्षाचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु, आम्ही ते होऊ देणार नाही.”

महायुतीकडून तुम्हाला वेगळं करण्याचा, एकटं पाडण्याचा प्रयत्न होत असताना तुमच्याकडे प्लॅन बी आहे का? किंवा स्वबळावर, इतर कुठल्या पक्षाबरोबर युती करून निवडणूक लढण्याचा विचार पक्षाने केला आहे का? असा प्रश्न विचारल्यावर अमोल मिटकरी म्हणाले, “स्वबळावर लढण्याबाबत विचार झाला आहे. काही आमदारांनी त्यास अनुकूलता दर्शवली आहे. परंतु, काही आमदारांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या मतदारसंघात महायुतीतच निवडणूक लढवली पाहिजे. कारण महायुतीत त्यांची ताकद आहे. तर काही आमदार स्वतंत्र लढण्यासाठी तयार आहेत.”

अजित पवार गटातील आमदार म्हणाले, “विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात आमची ५० ते ५५ जागांवर बोळवण होत असेल तर मग आम्ही वेगळा मार्ग निवडू शकतो. त्याचा निर्णय अर्थातच वरिष्ठ पातळीवर होईल. मला महायुतीमधील इतर पक्षांना सांगायचं आहे की त्यांनी आम्हाला कमजोर समजू नये. अजित पवार एकटेच जातील, एकटेच निवडणूक लढतील, असे समजू नये.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button