काळेवाडीतील अभियांत्रिकीची बोगस पदवी देणा-या संस्थेच्या संस्थापकास अटक
- निलरत्न इन्स्टिट्यूटचे निलेश ठाकरे यांना वाकड पोलिसाकडून अटक
- पुणे व नाशिक येथील संस्थेच्या कार्यालयास केले सील
पिंपरी ( महा ई न्यूज ) – काळेवाडी येथील निलरत्न इन्स्टिट्युटमध्ये केवळ 40 हजारात अभियांत्रिकीची बीई, एमई डिग्री सर्टीफिकेट देण्यात येत होते. या संस्थेकडून मागील दहा वर्षात हजारो विद्यार्थ्यांना डिग्री व डिप्लोमा सर्टीफिकेट दिलेले आहे. त्या बोगस डिग्री वाटप करणा-या निलरत्न इन्स्टिट्युटचे संस्थापक अध्यक्ष निलेश ठाकरे यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. तसेच काळेवाडी व नाशिकमधील संस्थेचे कार्यालय पोलिसांनी सील केले आहे.
पिंपरी चिंचवडसह पुण्यातील हजारो तरुणांना अवघ्या सात दिवसात अभियांत्रिकी पदवी देण्यात येत होती. याबाबत निलरत्न इन्स्टिट्युटने अनेक ठिकाणी जाहिराती करुन विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. निलरत्न इन्स्टिटयूटचे संस्थाचालक निलेश ठाकरे यांनी दिलेल्या जाहिरात दिली होती. त्यावरुन मानवी हक्क संरक्षण जागृतीचे संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, उपाध्यक्ष डॉ अभिषेक हरिदास आणि संचालक अण्णा जोगदंड यांनी जाहिरातीत नमूद नंबरवरुन संर्पक साधला.
त्यानंतर संस्थाचालकांनी त्यांना ई-मेल करून ४० हजारात भरल्यानंतर सात दिवसात BE पदवी देतो असे कळवले. त्यानंतर संस्थेने ई-मेल मध्ये या इन्स्टिटयूटमधील पदवीचा नमुना पाठवला. त्या पदवी सर्टीफिकेटची शंका आल्याने डॉ अभिषेक हरिदास यांनी DTE चे विभागीय संचालक याना विचारणा केली.
त्यांनी सदर संस्थेस कोणतीही मान्यता नाही, असे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेने वाकड पोलीस स्टेशनमध्ये फसवणुक केल्याचे गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यावर संस्थाचालक निलेश ठाकरे यांनी अटकपूर्व जमीन मिळावा म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. त्याचा जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी अटकपूर्व जमीन अर्ज नामंजूर केला. त्यामुळे संस्थाचालकांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र, तिथेही त्याचा अर्ज फेटाळला गेल्याने अखेर निलेश ठाकरे यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांना पिंपरी न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसाचा पोलिस कोठडी मिळाली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास एपीआय विरेंद्र चव्हाण हे करीत आहेत.