Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
शालेय साहित्यापासून विद्यार्थी वंचित; महापालिकेवर विद्यार्थ्यांचा अर्धनग्न धडक मोर्चा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/pcmc-bjp-2.jpg)
– विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी रयत विद्यार्थी विचार मंच काढणार मोर्चा
– सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात विद्यार्थी उघड्यावर
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य न मिळाल्याने रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेवर बुधवारी (दि.26) अर्धनग्न धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती रयत विद्यार्थी मंचचे अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी दिली. दरम्यान, सत्ताधारी भाजप पदाधिका-यांचा काळात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना उघड्यावर बसण्याची वेळ आली आहे. याकडे महापाैर, सत्तारुढ पक्षनेते आणि विरोधी पक्षनेत्यांचे दुर्लक्ष झाले आहे.
यासंर्दभात महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर उद्योगनगरी म्हणून आशिया खंडात ओळखले जाते. हे शहर कष्टकरी, कामगार, मजूर वर्गाच्या श्रमावर उभारले आहे. या शहरातील कामगार, कष्टक-यांची मुले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. महानगरपालिकेचे 207 बालवाडी, 130 प्राथमिक आणि 18 माध्यमिक शाळा कार्यरत आहेत. बालवाडी ते माध्यमिक द्याळेत सुमारे 55 हजार विद्यार्थी शिकत आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांना मागील 20 वर्षापासून वेळेवर शालेय साहित्य मिळत आहेत. यामध्ये गणवेश, पीटी गणवेश असे विविध साहित्य वेळेवर दिले जाते. राजकारणाच्या साठमारीत गतवर्षी विद्यार्थ्यांना वर्षभर शूज मिळालेच नाहीत. मात्र, यंदाचे शैक्षणिक वर्षांस प्रारंभ होवून आठवडा झाला. तरी शालेय साहित्य मिळालेले नाहीत.
श्रीमंत महानगरपालिकेची बिरुदावली मिरवणा-या पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिणीवर गणवेशाअभावी शाळेत यावे लागत आहे. ही बाब महापालिकेसाठी निंदनीय आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर शालेय साहित्य मिळालेले नाही. आम्हाला वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यानुसार आयक्तसाहेब… आपण शालेय साहित्यासाठी डीबीटी मोहीम राबविणार असल्याचे समजले. परंतु, डीबीटी योजना राबविल्यास विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होण्याऐवजी पालकांनाच लाभ होईल, कारण सर्व विद्यार्थी हे गोरगरीब, कष्टकरी मजुराची मुले असल्याने डीबीटीचे सर्व अनुदान हे पालक खर्चून टाकतील. त्यामळे सर्व विद्यार्थ्यांना डीबीटी न राबविता पुर्वीप्रमाणे शालेय साहित्य द्यावे, जेणे करुन सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल.
दरम्यान, आयुक्तसाहेब… आपण मंगळवार (दि.२५) रोजी महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप करावे, अन्यथा रयत विद्यार्थी विचार मंच, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने शालेय साहित्य न मिळाल्याने बुधवार (दि.२६) रोजी दुपारी 12 वाजता. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांना अभिवादन करुन महापालिकेवर विद्यार्थ्यांना अर्धनग्न धडक मोर्चा काढण्यात येईल. तसेच महापालिकेसमोरच शाळा भरविण्यात येईल. असा इशारा साळवे यांनी दिला आहे.