भाजपला सत्तेपासून दूूर ठेवण्यासाठीच जेडीएसला पाठिंबा – कॉंग्रेस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/congress-673x420.jpg)
हैदराबाद – कर्नाटकात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच जेडीएसला पाठिंबा दिल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे. तसेच, सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेस-जेडीएस आघाडीला निमंत्रण देण्याविषयी राज्यपाल घटनात्मकदृष्ट्या बांधील आहेत, अशी भूमिकाही कॉंग्रेसने मांडली आहे.
कॉंग्रेसने जेडीएसला पाठिंबा देण्याचे पाऊल चांगले ठरेल का, असा प्रश्न पीटीआय वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने आज कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एम.वीरप्पा मोईली यांना विचारला. त्यावर ते उत्तरले, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात आम्हाला रस आहे. सरकार स्थापनेसाठी जेडीएसला पाचारण करण्यास राज्यपाल वजुभाई वाला बांधील आहेत.
राज्यपालांना भाजपचा एजंट म्हणून नव्हे तर राज्याचा घटनात्मक प्रमुख कार्य करावे लागेल, अशी पुस्तीही मोईली यांनी जोडली. मागील वर्षीच्या गोवा विधानसभा निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला. त्यानुसार, सर्वांत मोठ्या पक्षाला नव्हे तर सरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ असणाऱ्यांना पाचारण करण्यास राज्यपाल बांधील आहेत, असेही ते म्हणाले.
कॉंग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही दिल्लीत पीटीआयशी स्वतंत्रपणे बोलताना अशाच प्रकारची भूमिका मांडली. कॉंग्रेस-जेडीएस आघाडीला सरकार स्थापनेचे निमंत्रण देण्यास राज्यपाल घटनात्मकदृष्ट्या बांधील आहेत. राज्यपालांपुढे इतर कुठलाही पर्याय नाही, असे ते म्हणाले.