सागरी किनारा मार्ग वेळेत पूर्ण करणार- मुख्यमंत्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/costal-road.jpg)
मुंबई : सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड)चे काम वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न असून मेट्रोसह या प्रकल्पाला उच्च न्यायालयात आव्हान दिले गेल्याने या प्रकल्पांना १० महिन्यांचा विलंब झाला आणि मेट्रोचा प्रकल्प खर्चही एक हजार कोटी रुपयांनी वाढला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत सांगितले. मच्छीमारी व कोळी समाजबांधवांना कोस्टल रोड प्रकल्पामुळे कोणताही त्रास होणार नाही, त्यांच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
कोस्टल रोड प्रकल्पाबाबत अनंत गाडगीळ, शरद रणपिसे व इतरांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्पांचे वाद न्यायालयात रखडल्याने वाढत असलेल्या प्रकल्प खर्चाची व होत असलेल्या विलंबाबाबत चिंता व्यक्त केली. कोस्टल रोडबाबतचे न्यायालयीन वाद लवकरच मिटतील व हा प्रकल्प मार्गी लागेल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.
मेट्रोच्या भूमिगत प्रकल्पाबाबत काही मुद्दे न्यायालयात गेले, कोणाला दिवसा काम केल्यामुळे त्रास, तर कोणाला रात्री काम केल्यास त्रास होतो, अशा तक्रारी होत्या. त्यामुळे प्रकल्पास काही विलंब झाला व खर्चातही वाढ झाली.