कोब्राचे दोन कोटींचे विष जप्त; चौघांना अटक

पुणे – बेकायदेशीररीत्या कोब्रा जातीच्या सापाचे तब्बल एक लीटर विष जवळ बाळगणार्या चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट 2 पथकाने अटक केली होती. या विषाची आंतराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत २ कोटी २८ हजार ३०० रुपये आहे. चौघांनाही शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनविण्यात आली.
गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कॅम्प परिसरात चौघेही संशयित आरोपी कोब्रा जातीचे विष विक्रीसाठी येणार असल्याची खबर युनिट 2 च्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर कॅम्प परिसरात चौघेही आल्यानंतर संशयीतरित्या हालचालीवरून चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून कोब्रा सापाचे एक हजार मिली सापाचे विष त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
शुक्रवारी दुपारी चौघांना पोलिस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांनी हे विष नेमके कोठून आणले, ते पुण्यात कोणाला विकणार होते ? त्यांच्याकडे आणखी काही प्रतिबंधित वन्यप्राणी सामग्री आहे का? याचाही तपास पोलिसांना करl आहेत. तसेच जप्त केलेले विष हे मोठ्या प्रमाणात असून यामागे कोणती आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग आहे का ? याचा ही तपास होणे गरजेचे असल्याने चौघांनाही सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील भानुप्रिया पेटकर यांनी केली.
तर गुन्हे शाखेच्या युनिट 2 चे पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जयवंत जाधव करीत आहेत.




