रस्त्यावरील पावसाळी गटारांमध्ये जलसंचय खड्डय़ांचा उपक्रम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Untitled-34.jpg)
भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी महापालिका आता रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा वापर करणार आहे. त्यासाठी रस्त्यांवरील पावसाळी गटारांमध्ये जलसंचय खड्डे (ग्राउंड वॉटर रिचार्ज होल्स) तयार करण्याचा अभिनव उपक्रम महापालिकेने खासगी बांधकाम व्यावसायिकाच्या मदतीने हाती घेतला आहे. खराडी परिसरात दोनशे ठिकाणी असे जलसंचय खड्डे तयार करण्यात येणार असून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पुढील पंचेचाळीस दिवसांत हा उपक्रम पूर्ण केला जाणार आहे. जलसंचय खड्डय़ांमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल.
पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पावसाळी वाहिन्यांच्या चेंबर्समध्ये हे खड्डे घेतले जाणार आहे. काँक्रिटच्या पृष्ठभागावर पडणारे पावसाचे पाणी शहरातील या वाहिन्यांच्या माध्यमातून नदीत जाते. त्यामुळे या वाहिन्यांच्या माध्यमातूनच पावसाच्या पाण्याचा संचय करण्याचा या उपक्रमा मागील हेतू आहे. बांधकाम क्षेत्रातील गेरा डेव्हलमेंट्सच्या सहकार्याने महापालिका हा उपक्रम राबविणार आहे. खराडी येथील प्रायोगिक तत्त्वावरील हा उपक्रम यशस्वी झाल्यास त्याची अंमलबजावणी शहरातील विविध भागात करण्यात येणार आहे, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.
खराडी परिसरातील नगर रस्ता परिसरातील ग्रीन्सविले एव्हेन्यू रोड, खराडी गाव चौक, पार्क व्ह्य़ूव्ह रोड, ढोले पाटील महाविद्यालय रस्ता अशा तीन किलोमीटर लांबीच्या पट्टय़ात हा उपक्रम राबविण्यात येईल. पावसाळ्यात गटारांमधून वाहणारे पाणी भूगर्भात साठविण्यास यामुळे मदत होणार आहे.
शहरातील भूगर्भातील पाण्याची पातळी झपाटय़ाने कमी होत आहे. त्यातच पावसाचे प्रमाणही घटल्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग (पर्जन्य पुनर्भरण यंत्रणा) हा पर्याय पुढे आला आहे. शहरातील अनेक सोसायटय़ा, मोठमोठे गृहप्रकल्पांमध्ये पावसाळ्यातील पाणी साठविण्याची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. भूजपातळी वाढविण्यासाठी अनेक उपक्रमही हाती घेतले जात आहेत. त्याअंतर्गत प्रथमच खासगी बांधकाम व्यावसायिकाच्या सहकार्याने हा प्रयोग होणार आहे. जलसंचय खड्डे घेण्यासाठी भूजल साठय़ाखाली ६० फूट खोलीवर खड्डे घेण्याचे प्रारंभी निश्चित करण्यात आले होते. मात्र ग्राउंड वॉटर सव्र्हे अॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सीने केलेल्या भौगोलिक सर्वेक्षणानंतर शंभर फूट खोल खड्डे आणि बोअर घेण्याचे निश्चित करण्यात आले. हा प्रयोग काहीसा खर्चिक ठरणार असून त्यासाठी पन्नास लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे जमिनीत पाणी मुरून त्याचे साठे तयार होतील, असा भूभाग कमी झाला आहे. त्यामुळे जलसाठय़ात भर पडत नाही. परिणामी दरवर्षी या जलसाठय़ांमधील पाण्याची पातळी कमी होत आहे. यासाठी भूगर्भात पाणी जाण्यासाठी खोल बोअरवेल तयार करण्यात येणार आहेत.
या उपक्रमाचा गेरा डेव्हलपर्सच्या प्रकल्पांमधील रहिवाशांनाही या फायदा होईल. निवासी आणि व्यावसायिक संकुले उभारताना समाजासाठी काही करण्याच्या हेतूने पाणीसाठे पुनरुज्जीवित करण्याचा उपक्रम हाती घेतल्याचे गेरा डेव्हलमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा यांनी सांगितले.