अमोल कोल्हे खासदार झाल्याने चाहत्याचा पण पुर्ण, दोन महिन्यानंतर पायात घातली चप्पल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Amol-kolhe-fan.jpg)
पुणे – अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. डाॅ. कोल्हे यांचा विजय व्हावा, यासाठी प्रत्येक जण आपापल्या परिनं त्यांच्या प्रचारात सहभागी होत होता, यामध्ये त्यांचा चाहत्यावर्गाचाही मोठा समावेश होता. यापैकीच एका त्यांच्या चाहत्यानं डॉ. अमोल कोल्हे जोपर्यंत खासदार होत नाहीत तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा निर्धार केला होता. तो पण त्यांचा दोन महिन्यांनंतर पुर्ण झाला आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातून डाॅ. अमोल कोल्हे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा दणदणीत पराभव केला. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे डाॅ. कोल्हेंचा विजय व्हावा, याकरिता पायात चप्पल न घालण्याचा पण एका चाहत्याने केला होता.
सदाशिव बेले असं त्याचं नाव आहे. बेले हे धामनगाव (तालुका वसमत) येथील रहिवासी आहेत. लोकसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सदाशिव यांनी कोल्हेंच्या विजयासाठीचा पण केला होता आणि तो पूर्णदेखील केला. जवळपास दोन महिने ते सर्वत्र अनवाणीच प्रवास करत होते. मराठवाड्यातील 42-45 अंश सेल्सिअस तापमानात अनवाणी पायांनी फिरणं तशी सोपी गोष्टी नव्हती. यादरम्यान त्यांच्या पायांना जखमादेखील झाल्या. पण अमोल कोल्हेंवरच्या प्रेमापोटी त्यांनी आपला निर्धार पूर्ण केला.
दरम्यान, गावातील अनेक जण त्याची चेष्टा करत होते पण ते सर्वांना एकच गोष्ट सांगत होते की,”माझ्या संभाजी महाराजांना ज्या कलम कसायांनी इतिहासात बदनाम करण्याचं काम केलं, त्याला पुसून खरा इतिहास जनतेपुढे माडूंन लहानांपासून-थोरांपर्यंत पोहोचवण्याच्या त्यांच्या कामावर प्रभावित होऊन मी दोन महिने अनवाणी चालण्याचा निर्धार केला आहे”.