रोहित पवार यांच्या पुढाकारातून सृजनतर्फे विभागीय भजन स्पर्धेचे आयोजन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/Rohit.jpg)
पिंपरी : राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांच्या संकल्पनेतून येत्या १० ते १६ जून दरम्यान बारामती येथील शारदानगर येथे पुणे, अहमदनगर आणि सातारा तीन जिल्ह्यांची सृजन भजन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी जामखेड तालुक्यातील भजन मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे अवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी आणि तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी केले आहे.
राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी मागील वर्षीपासून अध्यात्मिक परंपरा असलेल्या सृजन भजन स्पर्धेची सुरवात केली. यावर्षी या स्पर्धेचे दुसरे वर्ष असून यातील तालुका आणि जिल्हास्तरीय स्पर्धेतील भजनी मंडळांचे १० ते १५ जून पर्यंत शारदानगर येथील शारदाबाई पवार शैक्षणिक संकुलातील दिनकर सभागृहात सादरीकरण होणार आहे. १६ जून रोजी याची अंतिम फेरी असून ती अप्पासाहेब पवार सभागृहात होणार आहे.
पुणे, अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यांमधील भजनी मंडळांची ही एकत्रित स्पर्धा होत असून खुला गट आणि युवा गट अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. खुल्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे ३१ हजार, २१ हजार आणि ११ हजार तर युवा गटासाठी २५ हजार, १५ हजार आणि ११ हजार रुपयांची पारितोषिके आहेत. या स्पर्धेतून उत्कृष्ठ संघ, गायक आणि वादक अशीही स्वतंत्र पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेत प्रत्येक तालुकानिहाय दोन
उत्कृष्ठ संघ निवडून त्यांची जिल्हास्तरीय आणि त्यानंतर विभागाची एकत्र अंतिम स्पर्धा १६ जून रोजी होईल. १६ जून रोजी होणाऱ्या महाअंतिम सोहळ्यात राज्यभरातील विविध देवसंस्थानांचे उत्तराधिकारी, विश्वस्त, सोहळाप्रमुख उपस्थित राहणार आहेत.
रोहित पवार हे गेली काही वर्षांपासून सृजनच्या माध्यमांतून कला, क्रिडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत आहेत. त्या माध्यमांतून त्यांनी आतापर्यंत सृजन क्रिकेट स्पर्धा, कबड्डी आणि भजन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. मागील वर्षी पुणे जिल्ह्यात भजन स्पर्धा झाली, त्यामध्ये ३०० हून अधिक भजनी मंडळे सहभागी झाले होते.
सोशल फेरीने होणार स्पर्धेची सुरवात
पुणे, अहमदनगर, सातारा या तीन जिल्ह्यात होणाऱ्या विभागीय सृजन भजन स्पर्धेत व्हॉटसअॅप फेरीची संकल्पना प्रथमच राबविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळांची संख्या लक्षात घेऊन तसेच मंडळांचा वेळ वाचविण्याच्या दृष्टिने पहिली फेरी व्हॉटसअॅपवरून घेतली जाणार आहे. मंडळाने तीन मिनिटांचे आपले भजन मोबाईलवर व्हिडिओ अथवा ऑडिओ स्वरूपात रेकॉर्ड करून त्याची क्लिप सृजनने जाहीर केलेल्या जिल्हानिहाय व्हॉटसअॅप क्रमाकांवर पाठवावी. व्हॉटसअॅप फेरी सुरू झाली आहे. पुणे विभाग 7350874444, नगर विभाग – 7057000086, सातारा विभाग – 7057000085. अधिक माहितीसाठी- 7666301298 या क्रमांकावर संपर्क साधावा असे अवाहन सृजनतर्फे करण्यात आले आहे.