या दोन मावळ्यांनी लावला गडाला ‘सुरूंग’; शिरूरच्या विजयाचे ठरले मानकरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/datta-kaka-sane.jpg)
- ‘काका’ आणि ‘शेठ’ ठरले शिरूरचे किंगमेकर
- ‘साहेब’ आणि ‘दादां’ना दिलेला शब्द पाळला
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शिरूर लोकसभा मतदार संघात डॉ. अमोल कोल्हे यांनी तीनवेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांचा दणदणीत परभाव केला आहे. या पराभवाचे खरे श्रेय भोसरीतील राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांना जाते. त्यांनी रात्रीचा दिवस करून कोल्हे यांच्या प्रचाराची धुरा जाणिवपूर्वक सांभाळल्याने कोल्हे यांच्या विजयाची पताका शिरूरच्या गडावर जोमाने फडकत आहे.
शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूरचे तीनवेळा खासदार राहिले आहेत. त्यांना पराभूत करणे कोल्हे यांच्यासाठी मोठे आव्हान होते. कोल्हे अभिनेते असले तरी राजकीय क्षेत्रातील त्यांचे डावपेच खरे ठरतील, याची खात्री राजकीय क्षेत्रातील जाणकारांना नव्हती. म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हे यांना निवडून आणण्याची सर्वस्वी जबाबदारी भोसरीतील माजी आमदार विलास लांडे आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांच्यावर सोपविली होती.
अमोल कोल्हे यांच्या प्रचाराचा नारळ भोसरीत फोडल्यानंतर दत्ताकाका साने यांनी चिखलीतून त्यांच्या प्रचाराला जोरदार सुरूवात केली. तुफान रॅली, पदयात्रा काढून कोल्हे यांच्यासाठी वातावरण अनुकूल करून सोडले. मुळात काका आणि कोल्हे यांची राजकारणाच्या पलीकडची मैत्री आहे. खासगी कार्यक्रमात देखील कोल्हे काकांच्या घरी स्वेच्छेने भेट देतात. तो स्नेह जपून काकांनी दादांना दिलेला शब्द पाळला आहे. तर, माजी आमदार विलास लांडे यांनी देखील काकांसोबत सक्रीय सहभाग घेऊन कोल्हे यांच्या विजयासाठी भोसरीत मेहनत घेतली आहे. त्यामुळे कोल्हे यांच्या विजयाचे श्रेय दत्ताकाका आणि लांडे यांना जाते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.