दोन्ही जागा स्वाभिमानीचे उमेदवार मताधिक्याने जिंकणार – राजू शेट्टी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/raju1.jpg)
मुंबई : लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. गुरुवारी निकाल लागणार असून, दोन्ही ठिकाणी आमचाच विजय होणार असल्याचा दावा खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. गतवेळच्या मताधिक्क्यांपेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून येऊ असे राजू शेट्टी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर सांगली मतदारसंघातून विशाल पाटील तर हातकणंगलेमधून राजू शेट्टी स्वतः रिंगणात होते. लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा मिळणार असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यामुळे शेट्टींचे कार्यकर्ते संभ्रमात होते. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन्ही उमेदवार मताधिक्क्याने विजय होणार असल्याचा दावा शेट्टी यांनी केला आहे. मतदारांच्या मनात काय आहे, हे चांगले माहीत आहे. निकालाची वाट पाहत असून मनामध्ये कसल्याही प्रकारची धाकधुक असण्याची गरज नाही. असे राजू शेट्टी म्हणाले.
खासदार शेट्टी म्हणाले की, सगळीकडे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. माध्यमांमध्ये असे वृत्त जाणीवपूर्वक पसरविले जातात, जेणेकरून सट्टेबाजांना सट्टा खेळायला सोपे जावे. सट्टा घेणारे मालामाल होतील, पण सट्टा खेळणारे बरबाद होतील. जो निकाल आहे, तो तसाच लागेल असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.