शरद पवार यांची बीडमधील चारा छावणीला भेट; शेतकरी, चारा छावणी मालकांनी मांडल्या व्यथा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/pawar2.jpg)
बीड : देशाचे नेते शरद पवार सध्या मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी दौ-यावर आहेत. पवार यांनी आज सकाळी बीड जिल्ह्यातील खडकत येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील एका चारा छावणीला देखील त्यांनी भेट दिली. यावेळी समस्याग्रस्त शेतकरी व चारा छावणी मालकांनी पवार यांच्यासमोर व्यथा मांडल्या.
स्वामी बहुउद्देशीय सेवा संस्थेने चालवलेल्या छावणीमध्ये प्रामुख्याने एक तक्रार आली की, छावणी जवळ जवळ २७ मार्चला सुरु झाली. परंतु, अद्यापही छावणीचे अनुदान शासनाने दिलेले नाही. परिणामी व्याजाने पैसे घेवून छावणी चालवण्याचा प्रसंग छावणी चालकांवर आलेला आहे. यासाठी ९० रुपये दिले जातात. हे सुद्धा चाऱ्याचे भाव पाहता कमी आहेत. पाणी दूर अंतरावरून आणावं लागतं. ते सगळं पाहता छावणीचा खर्च परवडणारा नाही. त्यामध्ये वाढ करून देण्याची मागणी छावणी चालकांनी, शेतकऱ्यांनी पवार यांच्याशी बोलताना केली. दुधाचे दर दोन रुपयांनी कमी झाले आहेत. आधीच दुधाचे उत्पादन घटले. शेतकरी वर्गावर हे एक मोठे संकट आले आहे. विम्याचे पैसे मिळाले नाही. फळबागा जळून गेलेले आहेत त्यासाठी कोणत्या प्रकारचा अनुदान नाही त्या वाचवण्यासाठी ही सुद्धा समस्या आहे अशा अनेक समस्या, अडचणी शेतकऱ्यांनी पवार यांच्याकडे बोलून दाखवल्या.
छावणी चालकांनी एक नवीन समस्या यावेळी शरद पवार यांच्याजवळ मांडली. त्यामध्ये टॅग जनावराला लावतात जनावरांची संख्या अचूक रहावी त्यामध्ये फेरफार होवू नये म्हणून परंतु हा जरी शासनाचा उद्देश असला तरी टॅग लावून अपलोड करणे हे जिकिरीचे काम आहे त्यामुळे शासनाने त्यासाठी स्वतंत्र व्यक्ती नेमावा.शासनातर्फे ते केल्यास पारदर्शकतेच्या दृष्टीने चांगले होईल आणि चारा छावणी चालकावरील हा अतिरिक्त भार कमी होईल अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.
शरद पवारसाहेबांनी पाटोदाकडे जात असताना रस्त्यातही अनेक गावांमध्ये थांबून जनतेशी संवाद साधला त्यावेळी अनेक ठिकाणी त्यांचे महिलांनी औक्षण करूनही स्वागत केले. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी आमदार राजेंद्र जगताप, उषाताई दराडे, युवा नेते रोहित दादा पवार, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, बाळासाहेब आजबे, सतीश शिंदे, महेंद्र गर्जे, शिवाजी राऊत, व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.