व्यंग असलेल्या बाळाच्या पालकांची पोलिसांत तक्रार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/crime-1-1.jpg)
वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप
गर्भामध्येच बाळाला असलेले व्यंग वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे वेळीच लक्षात न आल्याचा आरोप परळचे रहिवासी अमित आणि श्रुतिका पांचाळ यांनी केला असून पाच वर्षांच्या प्रयत्नानंतर जन्माला आलेल्या मुलीचा वाचविण्यासाठी गेले ४२ दिवस हे दाम्पत्य झगडत आहेत. या दाम्पत्याने भोईवाडा पोलीस ठाण्यात रुग्णालयाविरोधात तक्रार देखील दाखल केली आहे.
लग्नानंतर पाच वर्षांनी गर्भवती राहिलेल्या श्रुतिकाने सुरुवातीपासूनच वाडिया रुग्णालयात उपचार घेतले. पांचाळ कुटुंब बाळाच्या येण्याची उत्सुकतेने वाट पाहत होते. आठ महिने पूर्ण झाल्यानंतर श्रुतिका तपासणीसाठी गेली असता बाळाच्या डोक्याला सूज आली असल्याने तातडीने प्रसूती करण्यास डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार २८ मार्चला प्रसूती करण्यात येऊन त्यांना मुलगी झाली. सर्वजण मुलीच्या जन्माच्या आनंदात असताना ती अपंग असून तिचे दोन्ही पाय निकामी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
जन्मत:च तिच्या मेंदूमध्ये पाणी झाले असून तिच्यामध्ये स्पाईन बिफिडा म्हणजेच मज्जारज्जू आणि पाठीचा मणका जोडलेला नाहीत हा दोष आहे. हा जन्मदोष असून यामध्ये मज्जारज्जूची वाढ झालेली नाही. याचा परिणाम मेंदूवरही होण्याची शक्यता असते. गर्भातील बाळातील व्यंग निदर्शनास आणणारी अॅनोमॅलिस चाचणी न केल्याने बाळामधील व्यंग वेळेत समजू शकलेले नाही. ही चाचणी डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे केली गेली नाही. परिणामी आज माझी इवलीशी मुलगी जीवन मरणाशी झगडत असल्याचे अमित यांनी सांगितले.
बाळाच्या मज्जारुज्जूंवर आठ दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली असून तिच्या मेंदूमधील पाणी शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात येणार आहे. मात्र आता तिच्या रक्तातही दोष असल्याचे आढळून आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती अमित यांनी दिली. रुग्णालयाने राजकारण्यामार्फत १० लाख रुपये देऊन तक्रार मागे घेण्यासाठीही दबाव आणला जात असल्याचे पांचाळ यांनी सांगितले.
आता न्यायालयीन लढाई..
रुग्णालय चूक मान्य करत नसले तरी माझ्याकडे पत्नीच्या आत्तापर्यंत केलल्या सर्व तपासण्यांचे कागदपत्र उपलब्ध आहेत. डॉक्टरांनी आपली चूक मान्य केल्याची चित्रफितही मी केलेली आहे. माझ्याप्रमाणे अन्य पालकांना आपल्या बाळाचे भविष्य अंधारात पाहावे लागू नये म्हणून मी आता न्यायालयीन लढाईही लढणार आहे. – अमित पांचाळ
पालकांनी केलेले आरोप खोटे असून रुग्णालयाचा यामध्ये कोणताही दोष नाही. यासंबंधी रुग्णालयातील कोणतीही माहिती आम्ही देऊ इच्छित नाही, असे वाडिया रुग्णालयाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले.