हिंजवडीत संगणक अभियंत्याला बेदम मारहाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/crime-1-1.jpg)
वाकड – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगणक अभियंत्याला बेदम मारहाण करून त्याच्याकडील पैसे आणि दुचाकी घेऊन लुटल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगणक अभियंता सूरज सुदर्शन प्रसाद कांत यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज सुदर्शन प्रसाद कांत हे कॉग्निझंट कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ते कामावरून घरी दुचाकी वरून जात होते. त्यांचा एका दुचाकीवर असलेले तीन अनोळखी इसम हे पाठलाग करत होते.
सूरज हे दत्तवाडी नेरे येथे पोहचताच पाठलाग करणाऱ्या दुचाकीवरील अज्ञात अनोळखी इसमानी दुचाकी आडवी लावली. सूरज यांना बेदम मारहाण करत त्यांच्याकडील रोखरक्कम आणि दुचाकी घेऊन पळ काढला. या घटनेमुळे हिंजवडी परिसरातील संगणक अभियंता यांच्यात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान,घटने प्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.