माझ्या दौऱ्यांमुळे जगात भारताची ओळख!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/modi-11.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य
कामरपाडा (पश्चिम बंगाल) : सततच्या परदेश दौऱ्यांमुळे विरोधकांनी नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मात्र या दौऱ्यांमुळे भारताची जगभरात ओळख झाली, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
पाच वर्षांपूर्वी क्वचितच भारताच्या मताला जगात महत्त्व होते. मात्र आता परिस्थिती बदलल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. चहावाला परदेश दौऱ्यांमध्ये व्यस्त आहे अशी टीका ममतांनी केली होती. मात्र आता याच दौऱ्यांमुळे देशाला जगभरात वेगळी ओळख मिळाल्याचे बिरभूम जिल्ह्य़ातील प्रचारसभेत पंतप्रधानांनी सांगितले. या पूर्वी कच्चे तेल व वायू आपल्याला अव्वाच्या सव्वा भावाने तसेच दीर्घकालीन कराराने घ्यावे लागत होते. आमच्या सरकारने चर्चेतून पुन्हा वाटाघाटी केल्याचे मोदींनी सांगितले. भारताची ताकद वाढल्याने परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना खटल्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांचा संदर्भ विजय मल्या व निरव मोदी यांच्याकडे होता. ताकद वाढल्याने अफगाणिस्तानमध्ये कामासाठी गेलेली बंगाली कन्या जुडिथ डिसूझा हिची सुटका करता आल्याचे सांगितले.
‘विरोधकांची हार’
लोहारडग्गा (झारखंड): मतदान यंत्रात फेरफार आल्याचा आरोप करीत ‘महामिलावटी’ विरोधकोंनी आता पराभव मान्य केला असून ते त्यासाठी कारणे शोधत आहेत. आतापर्यंत मतदानाच्या ज्या तीन फेऱ्या झाल्या त्यात विरोधकांना काहीच संधी मिळालेली नाही हे यातून स्पष्ट झाले आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. येथील सभेत त्यांनी सांगितले की, पराभव मान्य करण्यावाचून आता विरोधकांकडे पर्याय राहिलेला नाही. परीक्षेत चांगली कामगिरी झाली नाही की मुले वेगवेगळी कारणे सांगून बहाणे करतात, विरोधकांनी आता निवडणुकीतील त्यांच्या अपयशाचे खापर मतदान यंत्रांवर फोडण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या तीन टप्प्यात विरोधकांना काहीच हाती लागलेले नाही त्यामुळे आता त्यांच्यापुढे पराभव स्वीकारण्यावाचून पर्याय नाही.