‘पीसीएनटीडीए’ लवकरच ‘पीएमआरडीए’मध्ये विलिनीकरण – पालकमंत्री बापट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/13419f47d65e6cde6dde5f71f4cae065_XL.jpg)
पिंपरी- पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण(पीसीएनटीडीए) हे पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण (पीएमआरडीए)मध्ये विलिन करण्याच्या निर्णय राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
चिंचवड येथील एम्पायर इस्टेट पुलाचे लोकार्पण पालकमंत्री गिरीश यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी महापौर नितीन काळजे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक विलास मडिगेरी, शत्रुघ्न काटे, शीतल शिंदे आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले, ” 31 मार्च 2015 रोजी पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापन झाली. पुण्याच्या परिसराचा विकास करण्यासाठी पीएमआरडीएची स्थापना करण्यात आली आहे. पीएमआरडीएच्या माध्यमातून जिल्हा परिसराचा विकास मोठ्या पद्धतीने होत आहे. दर्जेदार विकास होत आहे. त्यामुळे पीसीएनटीडीए आणि पीएमआरडीए स्वतंत्र असण्यापेक्षा एकत्र करण्याचा विचार पुढे आला. त्यातून पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण(पीसीएनटीडीए) हे पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण (पीएमआरडीए)मध्ये विलिन करण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही लवकरच पूर्ण होईल. पीसीएनटीडीए पिंपरी-चिंचवड महापालिकेत विलिन करण्याची मागणी केली जात असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, त्याबाबत देखील सकारात्मक विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.