बंगळुरूसमोर आज दिल्लीचे आव्हान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/rcb-vs-dd.jpg)
नवी दिल्ली – आयपीएलच्या प्ले-ऑफ फेरीत स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर आज रंगणाऱ्या लढतीत दिल्लीचे आव्हान आहे. दिल्लीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले, तरी त्यांनी गेल्या सामन्यात हैदराबादविरुद्ध 187 धावांची मजल मारली होती. बंगळुरूची फलंदाजी बेभरवशी असल्यामुळे त्यांना उद्या सावध राहावे लागेल.
आयपीएलच्या अकराव्या हंगामात सुरुवातीपासूनच पिछाडीवर असलेल्या बंगळुरूने आतापर्यंत आपल्या 10 पैकी 7 सामन्यात पराभव पत्करला असून त्यांना केवळ तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यामुळे प्ले-ऑफ फेरीसाठी आपले आव्हान जिवंत ठेवायचे असल्यास इथून पुढे होणाऱ्या सर्व सामन्यात त्यांना विजय मिळवणे आवश्यक आहे, त्या दृष्टीने त्यांच्यासाठी आजचा सामना महत्त्वाचा असून आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास प्ले-ऑफ फेरीसाठी त्यांच्या आशा जिवंत राहातील.
दुसरीकडे चालू हंगामात अनेक अडचणींचा सामना करीत असलेला दिल्लीचा संघ स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेला सर्वात पहिला संघ ठरला आहे. आतापर्यंत त्यांना आपल्या 11 सामन्यांपैजी आठ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले असून केवळ तीन सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे. त्यांच्याकडे उत्तम फलंदाज असले, तरी त्यांना चांगल्या गोलंदाजांचा अभाव जाणवला. परिणामी दिल्लीला संघातील समतोल राखण्यात अपयश आले आहे. त्यामुळे हंगामातील आव्हान संपुष्टात आले असले तरी उरलेले सामने जिंकून मनोबल वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
बंगळुरूच्या संघातील गोलंदाजांची कामगिरी या हंगामात चांगली झाली असून त्यांची बलाढ्य फलंदाजी मात्र आपले अस्तित्व दाखवण्यात अपयशी ठरल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आजचा सामना जिंकून प्ले-ऑफ फेरीसाठी आपले आव्हान जिवंत ठेवायचे असल्यास बंगळुरूला आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये सुधारणा करत उत्कृष्ट सांघिक खेळ करण्याची गरज आहे. विराट कोहली आणि ऍब डीव्हिलिअर्स यांच्यावर त्यासाठी मोठी जबाबदारी आहे.
प्रतिस्पर्धी संघ-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (कर्णधार), ऍब डीव्हिलिअर्स, सर्फराज खान, ख्रिस वोक्स, युझवेंद्र चाहल, उमेश यादव, ब्रेंडन मॅक्युलम, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, क्विन्टन डीकॉक, मोहम्मद सिराज, कॉलिन डी ग्रॅंडहोम, कोरी अँडरसन, एम.अश्विन, पार्थिव पटेल, मोईन अली, मनदीप सिंग, मनन वोहरा, पवन नेगी, टिम साऊदी, कुलवंत खेजरोलिया, अनिकेत चौधरी, पवन देशपांडे व अनिरुद्ध जोशी.
दिल्ली डेअरडेव्हिल्स – श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत, गौतम गंभीर, ख्रिस मॉरिस, ग्लेन मॅक्सवेल, कगिसो रबाडा, अमित मिश्रा, शाहबाज नदीम, विजय शंकर, राहुल तवेतिया, मोहम्मद शमी, ट्रेन्ट बोल्ट, कॉलिन मन्रो, डॅनिअल ख्रिस्तियन, जेसन रॉय, नमन ओझा, पृथ्वी शॉ, गुरकीरतसिंग मान, आवेश खान, अभिषेक शर्मा, जयंत यादव, हर्षल पटेल, मनजोत कालरा, संदीप लामिचाने, सायन घोष.
सामन्याचे ठिकाण- बंगळुरू, सामन्याची वेळ- रात्री 8 पासून.