ज्येष्ठ पत्रकार डॅरिल डिमॉन्टी यांचे निधन

पर्यावरणविषयक पत्रकारितेचा पाया रचणारे ज्येष्ठ पत्रकार, पर्यावरणविषयक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुंबई आवृत्तीचे माजी निवासी संपादक डॅरिल डिमॉन्टी यांचे शनिवारी दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.
डिमॉन्टी हे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने आजारी होते. प्रकृतीअस्वास्थ्यामुळे त्यांना शनिवारी दुपारी वांद्रे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु काही तासांतच त्यांची प्राणज्योत मालवली. पर्यावरणाचा ऱ्हास, आदिवासींचे प्रश्न यांसारख्या विषयावर देशभर फिरून त्यांनी विस्तृत लेखन केले होते.
‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या मुंबई आवृत्तीसाठीही त्यांनी काही काळ निवासी संपादक म्हणून काम पाहिले होते. मुंबईतील कापड गिरण्या बंद पडण्यामागचे सत्य त्यांनी ‘मिल्स फॉर सेल’ आणि ‘रिपिंग द फॅब्रिक’ या पुस्तकांमधून समोर आणले होते. त्यांनी लिहिलेले ‘टेम्पल ऑर टॉम्ब्स : इंडस्ट्री व्हर्सेस एन्व्हायर्नमेंट’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. गेली काही वर्षे विविध वृत्तपत्रांमध्ये ते पर्यावरणविषयक लेखन करत होते. मुंबईतील पर्यावरणविषयक समस्यांचे निराकरण करण्याच्या कामातही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.




