मतदारांना दमदाटी झाल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/दहबह.jpg)
सोलापूर – लोकसभा निवडणूक निर्भयपणे पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. निवडणुकीच्या काळात मतदारांना मारहाण व दमदाटी झाल्यास किंवा मतदारांना उमेदवाराकडून मतदानयंत्रापर्यंत सोडण्यासाठी वाहनांवर खर्च होत असेल, तर मतदारांना याविरुद्ध अॅपद्वारे निवडणूक आयोगाकडे थेट तक्रार करता येणार आहे. सी व्हिजिल या अॅपच्या माध्यमातून मतदारांनी आॅनलाईन तक्रार केल्यास त्याचे नावही गुप्त ठेवण्यात येत आहे. अपंग मतदारांना मतदान केंद्रात आवश्यक असणा-या सुविधा देण्यासाठी त्यांच्या मदतीला पीडब्ल्यूडी अॅपही निर्माण करण्यात आले आहे.
आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे वाटल्यास नागरिकाने त्या घटनेचे छायाचित्र अथवा तीन मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड करावा. जीपीएस प्रणालीद्वारे स्वयंचलित स्थान मॅपिंगसह फोटो अथवा व्हिडीओ या अॅपवर अपलोड करावा. त्यानंतर तक्रारदार नागरिकाच्या मोबाईलवर एक युनिक आयडी प्राप्त होईल.
अॅप वापरकर्त्यास सी व्हिजिल अॅपद्वारे आपली ओळख लपवून तक्रार नोंदविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये मोबाईल नंबर आणि इतर व्यक्तिगत तपशील अॅप प्रणालीवर पाठवले जात नाहीत. त्यामुळे निनावी तक्रारीच्या बाबतीत तक्रारकर्त्यास पुढील संदेश मिळत नाहीत. मात्र, त्याच्या तक्रारीवर कारवाई केली जाते. तक्रार अपलोड केल्यापासून साधारण दीड तासात तक्रारीची स्थिती तक्रारकर्त्याला प्राप्त होईल. त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रारकर्त्याच्या मोबाईलवर तसा संदेश प्राप्त होईल. अपंग मतदारांना मतदान नोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हीलचेअरची मागणी आदी सोयी उपलब्ध करून देण्यासाठी पीडब्ल्यूडी अॅप निर्माण करण्यात आल्याची माहिती निवडणूक शाखा व पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मतदारांना पैसा, मद्य, अंमली पदार्थांचे वाटप करणे, शस्त्रसाठा अथवा शस्त्रवापर, मतदारांना मारहाण, दमबाजी, चिथावणीखोर भाषण, पेड न्यूज, फेक न्यूज, मतदारांना आमिष म्हणून वस्तूंचा वापर, मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक, उमेदवाराची मालमत्ता आदी विविध प्रकारच्या आचारसंहिता उल्लंघनाच्या प्रकरणात सी व्हिजिल अॅपवर तक्रार करता येणार आहे.