शिरूरमध्ये अमोल कोल्हे – शिवाजी आढळराव पाटील यांच्यात जंगी कुस्ती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/amol-k.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज) – राष्ट्रवादी काॅंग्रेसची आज (शुक्रवारी) दुसरी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये शिरूरमधून सिनेअभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीने शिरुरमधून तीव्र इच्छुक असलेले माजी आमदार विलास लांडे यांना डावलून डाॅ. कोल्हेंना उमेदवारी दिली. हा मतदार संघ युतीत शिवसेनेकडे असून तिथे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात लढाई पाहायला मिळणार आहे.
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिरुर मतदार संघावर चांगली पकड आहे. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. तर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे घराघरात अभिनेते डाॅ अमोल कोल्हे हे पोहोचले आहेत. त्यामुळे डाॅ. अमोल कोल्हे व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात तगडी कुस्ती पाहायला मिळणार आहे.
शिवसेनेचे हातावरील शिवबंधन तोडून घड्याळ बांधल्यानंतर राजकीय पटलावर चर्चेत आलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका संपताच मालिका विश्वातून काही काळसाठी निवृत्ती घेणार असल्याची घोषणा नाशिकच्या मालेगावात केली. कोल्हे यांनी अचानकपणे केलेल्या या घोषणेमुळे मराठी सिनेसृष्टीसोबत राजकीय क्षेत्रातील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
दरम्यान, डाॅ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आढळराव-पाटील आणि त्याच्यांत शाब्दीक चकमक उडाली, खासदार आढळरावांनी डाॅ.कोल्हेंची जात काढून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली ‘राष्ट्रवादी काँग्रेस अमोल कोल्हेंना मराठा नव्हे तर माळी म्हणून मैदानात उतरवत आहे. कोल्हे माळी समाजाचे आहेत. कुणी काहीही केलं तरी शिरूरमध्ये शिवसेनाच जिंकणार,’ असं खासदार आढळराव पाटलांनी म्हटलं आहे. त्यावर मी छत्रपतींचा मावळा असल्याचा टोला अमोल कोल्हेंनी यांनी लगावत माझी जात कोणती आहे ते विचारू नका. माझी जात आहे ‘छत्रपतींचा मावळा’ असं अमोल कोल्हे म्हणाले.