खासदार संजय काकडेंनी संभाजी बिग्रेडमधून निवडणूक लढवावी
पुणे – संभाजी ब्रिगेड लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. संभाजी ब्रिगेड पुणे लोकसभेची जागा लढवणार आहे. तशी तयारी संभाजी ब्रिगेडने केली आहे. संभाजी ब्रिगेडच्यावतीने अजून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही. मात्र भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांना पुण्यातून उमेदवारी देण्याची तयारी संभाजी ब्रिगेडची आहे. संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली.
“सध्या संजय काकडे हे उमेदवारीसाठी वेगवेगळ्या पक्षांकडे रोज मागणी करत आहेत. पण काकडे यांची होणारी फरपट पाहवत नाही, भाजपला संजय काकडे यांची किंमत नाही, आणि काँग्रेस संजय काकडे यांना स्वीकारायला तयार नाही. याचा अर्थ संजय काकडेंनी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ‘संभाजी ब्रिगेड’ मध्ये सहभागी व्हावं आणि कर्तुत्वान खासदार संजय काकडेंनी ‘संभाजी ब्रिगेड’कडून लोकसभा निवडणूक लढवावीठ, अशी ऑफर संभाजी ब्रिगेडने दिली आहे.
‘संभाजी ब्रिगेड’ची संपूर्ण निष्ठावंत ताकत संजय काकडेंच्या पाठीशी उभी करायला तयार आहे. आम्ही रक्ताचं पाणी करुन संजय काकडे यांच्या पाठीशी उभं राहू, असं संभाजी ब्रिगेडने म्हटलं. संजय काकडे यांनी संभाजी ब्रिगेडचा विचार करून लोकसभेची तयारी करावी आणि आपली फरफट थांबवावी, असं आवाहन संभाजी ब्रिगेडने केलं आहे.