राहुल गांधींच्या बालेकिल्ल्यात मोदी करणार एके-४७ रायफल्स निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/Modi.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा बालेकिल्ला अमेठीत जाणार आहेत. ३ मार्चला पंतप्रधान मोदी हे अमेठी मतदारसंघात एके-४७ रायफल्स निर्मितीच्या प्रकल्पाचा शुभारंभ करणार आहेत. रशियाबरोबरील भागीदारीत या प्रकल्पाची सुरूवात ऑर्डिनन्स फॅक्टरीत केली जाणार असून २०१० मध्ये त्याचे भूमीपूजन करण्यात आले होते. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून राहुल गांधीच्या मतदारसंघात जाण्याची मोदींची ही पहिलीच वेळ आहे. नुकताच पंतप्रधान मोदी हे सोनिया गांधी यांचा मतदारसंघ रायबरेलीतही गेले होते. मोदी हे या दौऱ्यावेळी इतर काही प्रकल्प सुरू करण्याबरोबरच गौरीगंज येथे एक जाहीरसभाही घेणार आहेत.
दरम्यान, अमेठीत राहुल गांधी यांचे प्रतिनिधीत्व करत असलेले चंद्रकांत दुबे यांनी म्हटले की, केंद्र सरकारने रशियाबरोबर एका करारावर स्वाक्षरी केली आहे. या अटींनुसार तंत्रज्ञानाचे आदानप्रदान होणार नाही. हत्यारे रशियाच बनवणार आहे. कोरवा ऑर्डिनन्स फॅक्टरी आधीपासून आहे. मशिनरीही लागलेल्या आहेत. रशियाबरोबर झालेल्या करारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांच्या जागेवर नवीन लोक कामावर घेतले जातील अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे मोदी हे कोरवा ऐवजी शाहगड ब्लॉक येथे ही घोषणा करत आहेत. अमेठीसाठी मागील पाच वर्षांत या सरकारने एकही मोठा प्रकल्प आणला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
गुरूवारी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी तयारीचा आढावा घेण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. महेंद्रनाथ पांडे आणि राज्यमंत्री मोहसिन रझा कार्यक्रमस्थळी गेले होते. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान हे ३ मार्चला येणार असल्याचे सांगितले. सुमारे साडेसात लाख एके ४७ नव्या स्वरूपातील एके ४७ रायफल्सची निर्मिती येथे होणार आहे.