शाह-मोदी या दोन ‘गब्बर सिंग’ची देशात दहशत-ममता बॅनर्जी

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतपध्रान नरेंद्र मोदी या दोघे शोले सिनेमातील गब्बर सिंग यांच्या प्रमाणेच खलनायक आहेत. त्यांची दहशत देशात आहे अशी खोचक टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. देशात डेमोक्रसी नाही तर नमोक्रसी आहे असाही टोला ममता बॅनर्जींनी लगावला आहे. बुधवारी महाआघाडीतल्या पक्षांची बैठक पार पडली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी हा टोला लगावला.
ममता बॅनर्जी यांनी याआधीही मोदी आणि शाह यांच्यावर टीका केली होती. तसेच सीबीआयच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी मोदी आणि शाह यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. या दोघांनाही त्यांनी शोले सिनेमातील गब्बर सिंग म्हटले आहे. याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी GST ला गब्बर सिंग टॅक्स म्हटले होते. मात्र आता ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांनाच गब्बर सिंग म्हटले आहे आणि त्यांना देश घाबरतो, त्यांनी देशात दहशत पसरवली आहे अशी टीका केली आहे. आता या सगळ्य टीकेला भाजपा नेत्यांकडून कसं उत्तर दिलं जाणार ते पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकांचं घोडामैदान जवळ आलं आहे. अशात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात सुरु आहेत. मोदींनी महाआघाडीच्या नेत्यांनी एक मोठी रॅलीही आयोजत केली होती. या रॅलीलाही अनेक दिग्गज नेते हजर होते. या सगळ्या माध्यमातून मोदींवर टीकास्त्र सोडण्यात येतं आहे. आता ममता बॅनर्जी यांनीही भाजपाला टीकेचं लक्ष्य केलं आहे.




