मार्केटयार्डच्या आंबेडकरनगर झोपडपट्टीत भीषण आग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/अग्नी-तांडाव.jpg)
पुणे- मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीत आज (शनिवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत 20 झोपड्या जळाल्याची माहिती आहे. दरम्यान, अग्निशामक दलाला या आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश मिळाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अग्निशमन दलाला सकाळी 10 वाजून 26 मिनिटांनी मार्केटयार्ड येथील आंबेडकर नगर झोपडपट्टीत आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या गाड्या व जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पुणे अग्निशमन दलाच्या 14 फायरगाड्या, 3 पाण्याचे टँकर आणि 10 खासगी पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. झोपडपट्टीत आग असल्याने घटनास्थळी 2 जेसीबी आणि 4 रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या मुख्य अग्निशमन अधिका-यांसह वरिष्ठ अधिकारी आणि जवळपास 70 जवान ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते.
या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले असून पाण्याची फवारणी सुरू आहे. दरम्यान, आंबेडकरनगर झोपडपट्टीत 3 ते 4 सिलेंडर एकापाठोपाठ एक फुटल्याने ही भीषण आग लागल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. तर आगीमध्ये कोणीही गंभीर जखमी किंवा जिवितहानी नसल्याची प्राथमिक माहिती आहे.