दुमडता येणारी तीनचाकी, १० हजारांचा लॅपटॉप..
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/Untitled-3-71.jpg)
नेहरू विज्ञान केंद्रात ‘नवकल्पनांचा महोत्सव’; वैविध्यपूर्ण उपकरणे पाहण्याची संधी
अवघ्या दहा हजार रुपयांचा लॅपटॉप, दुमडून ठेवता येणारी ट्राइक अशी संशोधन, कलात्मकतेतून साकारलेली उपकरणे पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. ‘शिकण्या-शिकवण्याच्या नवकल्पना’ या संकल्पनेवर आधारित असलेला ‘इनोव्हेशन’ महोत्सव २ ते ४ फेब्रुवारी या काळात नेहरू विज्ञान केंद्रात भरवण्यात येणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाचे कुलगुरू वसंत शिंदे यांच्या हस्ते येथे होणार आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण संस्थाच्या नवसंशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आर्थिकदृष्टय़ा वंचित घटकांतील विद्यार्थ्यांनाही संगणक उपलब्ध व्हावा, या हेतूने मुंबई आयआयटीने ‘लो कॉस्ट डिव्हाईस’ प्रकल्पाअंतर्गत तयार केलेला अवघ्या दहा हजार रुपयांचा लॅपटॉप हे या महोत्सवाचे आकर्षण असणार आहे. ही मूळ संकल्पना रासायनिक आयआयटीच्या अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक कण्णन मौदल्या यांची आहे. लॅपटॉपच्या प्रत्येक भागाची निर्मिती इथेच केली गेली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०१८ या कालावधीत १८०० लॅपटॉप भारतभरात पुरविण्यात आले आहेत. त्यात लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आहे. सी प्लस प्लस, जावा यासह १०० हून अधिक शैक्षणिकदृष्टय़ा महत्त्वाची सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. संस्थांनी किमान शंभर नग मागणी केल्यास पुरवठा करण्यात येतो. वैयक्तिक स्वरूपात मात्र या विक्री केली जात नाही, असे प्रकल्प प्रमुख मोहम्मद कासीम खान यांनी सांगितले.
दुमडून (फोल्ड करून) ठेवता येणारी आणि बॅटरीवर चालणारी पर्यावरणस्नेही ट्राइकही महोत्सवात पाहता येणार आहे. ही तीनचाकी चालवण्यासाठी परवान्याचीही आवश्यकता नाही. ‘कीरन’ ही मोटारसायकल खास खाद्यपदार्थ किंवा अन्य वस्तू घरोघरी पोहोचवणाऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. हीदेखील बॅटरीवर धावणार आहे. वळणावळणांच्या अवघड रस्त्यांसाठी तयार करण्यात आलेली ड्रिफ्ट बाइकही येथे मांडण्यात येणार आहे.
कार्यशाळा व व्याख्याने
आयआयटी मुंबईसह जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, होमी भाभा सेंटर फॉर एज्युकेशन, आयआयएसईआर आदी संस्थांनी साकारलेले प्रकल्प महोत्सवात पाहता येतील. शिक्षकांनी तयार केलेले शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांच्या कल्पनांमधून साकारलेले प्रयोगही या महोत्सवात पाहता येतील. कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान, हस्तकला या विषयांवर आधारित कार्यशाळा, व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी होण्यासाठी विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर ३० जानेवारीपर्यंत नोंदणी करणे आवश्यक असल्याची माहिती नेहरू विज्ञान केंद्राच्या शैक्षणिक अधिकारी मंजुळा यादव यांनी दिली.