व्यवसाय प्रशिक्षणाच्या 51 कोटीत गोलमाल ; नागरवस्तीचा कारभार चव्हाट्यावर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/pcmc_2017082655-8.jpg)
आयुक्तांनी नेमली चैाकशी समिती ः संस्थेचा कैाशल्य वाढ उपक्रम कागदोपत्री
पिंपरी (विकास शिंदे) – महिलांना पारंपारिक व्यवसाय प्रशिक्षण न देता, त्यांना नवनवीन कौशल्य आधारित व्यवसाय प्रशिक्षण देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. नागरवस्ती विभागाकडून अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दहा वर्षापासून महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देत आहे. परंतू, या प्रशिक्षणाचा फायदा न झाल्याने शहरात महिला सक्षमीकरण केवळ कागदोपत्री सुरु आहे. त्यामुळे संस्थेचा कैाशल्य वाढ उपक्रम संशयाच्या भोव-यात सापडला आहे. यामुळे सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाची आयुक्तांनी स्वतंत्र चैाकशी समिती नेमावी, त्यांचा अहवाल स्थायी समितीसमोर सादर करावा, अशा सुचना स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड यांनी आयुक्तांना दिल्या आहेत. परंतू, या प्रशिक्षणावर दोन वर्षांत तब्बल 51 कोटी 55 लाख 35 हजार 803 रुपये रक्कम खर्ची घालूनही महिलांच्या ज्ञान कैाशल्य वाढ कार्यक्रम यशस्वी झालेला नाही. संबंधित सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाअभावी व्यवसाय प्रशिक्षण राबविण्याच्या योजनेला खीळ बसली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडील महिला व बालकल्याण योजनेंतर्गत महिला, मुले-मुलींसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यात महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रमही राबविला जातो. या योजनेतंर्गत मेसर्स अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, पुणे या संस्थेकडून विविध 20 विषयांचे प्रशिक्षण महिलांना दिले जाते. महिलांचे सबलीकरण, सक्षमीकरण, त्यांच्या ज्ञान व कौशल्यात वाढ व्हावी, महिलांना नोकरी, व्यवसाय करुन त्यांच्या कौटूंबिक आर्थिक उत्पन्नात भर पडावी, याकरिता महिलांना रोजगार व स्वयंरोजगारास प्रवृत्त करणे आणि त्यासंबंधित व्यवसाय उभारणी करण्यास मदत केली जात आहे. महिला ज्ञान कौशल्य कार्यक्रमामध्ये शैक्षणिक अर्हते अभावी कुठलीही महिला वंचित राहणार नाही. त्यामुळे इच्छुक साक्षर महिलांना ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आहे.
दरम्यान, महिला ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रमांतर्गत 20 प्रशिक्षणापैकी 12 प्रशिक्षणाचे वर्ग नव्याने समाविष्ट केले असून, 6 प्रशिक्षण वर्ग हे पूर्वीचे ठेवले आहेत. यामध्ये सन 2016 – 17 या आर्थिक वर्षांत लाभार्थी संख्या 71 हजार 896 एवढी असून देयकानूसार गट संख्या 2 हजार 989 एवढी आहे. त्यावर सुमारे 21 कोटी 50 लाख 61 हजार 795 रुपये एवढा खर्च करण्यात आलेला आहे. तर सन 2017-18 या आर्थिक वर्षात लाभार्थी संख्या 63 हजार 904 एवढी असून देयकानूसार गट संख्या 2 हजार 522 एवढी आहे. त्यावर सुमारे 30 कोटी 4 लाख 74 हजार 8 रुपये खर्च केलेला आहे.
त्यामुळे दोन वर्षांत तब्बल 51 कोटी 55 लाख 35 हजार 803 रुपये रक्कम खर्ची घालूनही महिलांच्या ज्ञान कैाशल्य वाढ कार्यक्रम यशस्वी झालेला नाही. प्रशिक्षण दिलेल्या महिला कुठेही व्यवसाय करताना दिसत नाहीत. त्यामुळे महिला लाभार्थीची आकडेवाडी कागदोपत्री दाखवून संबंधित संस्थेने महिला सक्षमीकरण केल्याचे स्थायी समितीच्या निर्दशनास आले आहे. याबाबत नागरवस्ती विकास योजना विभागाचे संबंधित सहाय्यक प्रकल्प अधिकारी कुठलीही माहिती देत नाहीत, त्यामुळे महिलांच्या व्यवसाय प्रशिक्षणावर कोट्यावधी रुपये खर्चूनही सगळा पैसा पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चैाकशी समिती नेमणार असून त्याचा चैाकशी अहवाल स्थायी समितीकडे सादर करावा लागणार आहे.
व्यवसाय प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष
महापालिकेच्या महिला ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रमांतर्गत विविध 20 विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये प्ले ग्रुप व नर्सरी टिचर्स प्रशिक्षण, बायोडिग्रेडेबल पिशव्या तयार करणे, वधु मेकअप प्रशिक्षण, फ्रंट ऑफीस कम रिसेप्शनिस्ट प्रशिक्षण, रुग्णसेविका व रुग्ण आहार संतुलन प्रशिक्षण, सेल्सगर्ल व किरकोळ विक्रेता प्रशिक्षण, सुरक्षारक्षक प्रशिक्षण, सेंद्रीय खते व औषधी वनस्पतींची रोपे तयार करणे, स्पोकन इंग्लिश, संभाषण कौशल्य व व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षण, विमा सल्लागार प्रशिक्षण, बालसंगोपन व आहार नियोजन प्रशिक्षण, हॉस्पिटॅलिटी सहाय्यक प्रशिक्षण, कुशन कव्हर, डोअर मॅट, रजई तयार करणे, प्लॉस्टिक ग्रॅन्युअल्स तयार करणे, हस्तनिर्मितीसह विविध प्रकारच्या पेपरपासून विविध वस्तु व साहित्य तयार करणे, भारतीय मिठाई, स्नॅक्स तयार करणे, लोणची पापड, मसाले, ऍडव्हान्स केक तयार करणे, रेक्झीनपासुन पर्स, बॅगा व विविध वस्तु तयार करणे, सॅनिटरी नॅपकीन तयार करणे प्रशिक्षण, हाऊसकिपींग प्रशिक्षण, ज्वेलरी, फर टॉईज, केमिकल फ्लॉवर, सिरॅमिक फ्लॉवर पॉट, ग्लास पेटींग, स्टेन ग्लास पेटींग, फ्रेमिंग, पोस्टर फ्रेमिंग तयार करणे प्रशिक्षण दिले जाणार आहे.