जगातील अर्धे कुष्ठरोगी भारतात: डब्ल्यूएचओ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/Kushtrogi.jpg)
दिल्ली: जगभरातील अर्धे कुष्ठरोगी भारतात सापडत असल्याचा धक्कादायक खुलासा जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालात करण्यात आला आहे. कुष्ठरोगाबद्दल असलेली अनास्था,कुष्ठरोग्यांसोबत केला जाणारा भेदभाव आणि प्रचंड अज्ञान या तीन कारणांमुळे भारतात कुष्ठरोग्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
जगभरात दरवर्षी दोन लाख कुष्ठरोगी आढळतात. यातील एक लाख कुष्ठरोगी भारतात आढळतात. कुष्ठरोग निर्मुलनासाठी दोन महत्त्वाचे कायदे भारत सरकारने पारित केले आहेत. एक कायदा कुष्ठरोग्यांशी होणाऱ्या भेदभावाशी निगडीत आहे तर दुसरा कायदा कुष्ठरोगांमुळे होत असलेल्या घटस्फोटाशी निगडीत आहे. त्यांचेही जागतिक आरोग्य संघटनेने प्रचंड कौतूक केले आहे. कुष्ठरोग्यांसाठी पुरेशा आरोग्य सुविधा भारतात आज उपलब्ध नसल्यामुळे अनेक समस्या भारतात उद्भवत आहेत. भारताशिवाय ब्राझील,साऊथ आफ्रिका या देशांमध्येही कुष्ठरोग्यांचे प्रमाण अधिक आहे.