हिंजवडीत क्लीन अँड ग्रीन आयटी पार्क इनिशिएटिव्ह उपक्रम
पिंपरी – हिंजवडी आयटी पार्कमध्ये येणारी विदेशी मंडळी या परिसरातील स्वच्छतेबाबत कायम प्रश्न उपस्थित करीत असतात. या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचा विषय कायमस्वरूपी मार्गी लागावा, म्हणून हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने क्लीन अँड ग्रीन आयटी पार्क इनिशिएटिव्ह या अनोख्या उपक्रमाची सुरवात केली आहे.
या उपक्रमाला सुरवात केली, तेव्हापासून आतापर्यंत टप्पा एकमधील रस्त्यावरून सुमारे ३५ टिपर कचरा उचलण्यात आला आहे. रविवारी हिंजवडी भागात आठवडे बाजार भरतो. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचा कचरा साठलेला असतो. सोमवारपासून आयटी कंपन्यांचे काम सुरू होते. त्यामुळे या भागातून जाताना घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. बऱ्याचदा परदेशातील मंडळी कामानिमित्त येथील कंपन्यांत येत असतात. त्यामुळे रस्त्यावरचे हे चित्र चांगले दिसत नाही. असोसिएशनने खासगी कंपनीच्या माध्यमातून रस्ते स्वच्छ ठेवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याशिवाय रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या दुभाजकांत लावलेल्या झाडांची छाटणी करणे, त्या ठिकाणी जमा झालेला कचरा काढणे ही कामे या उपक्रमाअंतर्गत करण्यात येत असल्याचे भोगल यांनी सांगितले.