नगरचा उत्तर प्रदेश झालाय; याला भाजपच जबाबदार आहे : रामदास कदम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/resizemode-4MT-image-1.jpg)
अहमदनगर – शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. नगरमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून दहशत माजवण्याचा प्रकार सुरू आहे. नगरचा उत्तर प्रदेश झाला आहे. गृहखात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांचं हे अपयश आहे, अशी टीका कदम यांनी केली.
शिवसेनेचे संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर आज दिवसभर नगरमध्ये तणाव आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी येथे येऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘भाजप आमदार शिवाजी कर्डिले व राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप व अरुण जगताप हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. एकीकडे युती असल्याचे दाखवायचे व दुसरीकडे शिवसेनेच्या मुळावर घाव घालण्याचे भाजपचे धंदे आम्हाला नवीन नाहीत,’ असा आरोप रामदास कदम यांनी केला.
शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी व्हावी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे. दोन्ही मृत शिवसैनिकांच्या कुटुंबीयांची जबाबदारी शिवसेना घेणार, असेही त्यांनी जाहीर केले. या घटनेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असेही ते म्हणाले. सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे व कोतवाली पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या संगनमताने राष्ट्रवादीची नगरमध्ये गुंडगिरी सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणीही कदम यांनी केली आहे.