बुलेट ट्रेन खासगी कंपन्यांकडे? तिकीट दरांत निकोप स्पर्धा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/09/bullet-train.jpg)
मुंबई : मुंबई-अहमदाबाद मार्गावरील महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनचे भूमिपूजन वाजतगाजत झाल्यानंतर ही सेवा प्रत्यक्ष चालविण्यासाठी खासगी कंपन्यांचे मुक्तहस्ताने स्वागत करण्याचे धोरण आखले जात आहे. युरोप आणि जपानमध्ये या पद्धतीचे सूत्र अवलंबले जात असून ते यशस्वी ठरले आहे. त्यात भारतीय रेल्वेबरोबर खासगी कंपन्याही स्वतःच्या ताफ्यातील बुलेट ट्रेन चालवतील, असा पर्याय ठेवण्यात आला असून बुलेट ट्रेन प्रत्यक्ष सेवेत आल्यानंतर पाच वर्षानंतर खासगी कंपन्यांना या स्पर्धेत उतरता येईल, अशीही योजना आहे.
बुलेट ट्रेन चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल, अनुभव, तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. जपानकडून तंत्रज्ञानासह अन्य मदत होत असली तरी प्रत्यक्ष सेवा चालविण्याचे मोठे आव्हान भारतीय रेल्वेसमोर असेल. या स्थितीत, बुलेट ट्रेन सेवा सुरू झाल्यानंतर पाच वर्षानंतर खाजगी कंपन्यांना या मार्गावर सेवा चालविता येईल, असे सांगितले जात आहे.
युरोप, जपानमध्ये बुलेट ट्रेनच्या मार्गावर खासगी कंपन्या स्वतःच्या गाड्या चालवतात. मात्र, त्यासाठी इच्छुक कंपन्यांना बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतर खासगी कंपन्या त्यांच्या ध्येयधोरणानुसार स्वतःच्या गाड्या, संरचना, मनुष्यबळ, देखभाल आदी जबाबदाऱ्या स्वीकारू शकतील. या तऱ्हेने खासगी कंपन्यांचा सहभाग आल्यानंतर त्यांच्या गाड्यांना नेमकी कोणती वेळ द्यायची हे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन (एनएचएसआरसी)तर्फे ठरविण्यात येणार आहे.
खासगी कंपन्यांनी सेवेत आल्यानंतर त्यातील सुरक्षेसह विविध गोष्टींची जबाबदारी संबंधित कंपन्यांची राहणार आहे. या कंपन्यांतर्फे तिकीट दर ठरविण्यात येतील.
तिकीट दरांत निकोप स्पर्धा
इंग्लंड, फ्रान्स, इटली, स्पेन आदी देशांमध्ये बुलेट ट्रेन चालविण्यात येत असून त्या सेवा यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे भारतातील बुलेट ट्रेनमध्ये खासगी कंपन्यांचा सहभाग वाढल्यास तिकिटांच्या दरात निकोप स्पर्धा निर्माण होईल, असा विश्वास रेल्वे अधिकारी व्यक्त करत आहेत.