आगामी विधानसभेत भाजप स्वबळावर!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/09/bjp.jpg)
मुंबई – विधानसभेच्या आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता असल्याच्या अहवालाचा दाखला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या बैठकीत दिल्याची माहिती आहे. शनिवारी (ता. 9) उत्तन येथे भाजपच्या राज्यातील खासदार व आमदारांची बैठक आयोजित केली होती. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी या अहवालाचा संदर्भ देत पक्षातील नेत्यांना व आमदारांना इशाराही दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
पक्षाच्या अंतर्गत अहवालात भाजपला स्वबळावर 170 जागा मिळण्याचा अंदाज असल्याचे सुखावह चित्र असले तरी विद्यमान आमदारांपैकी 39 जण पुन्हा विजयी होण्याची शक्यता नसल्याचा निष्कर्षही या अहवालात नोंदवल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. त्यामुळे प्रत्येक आमदाराची या 39 जणांमध्ये कोण या धास्तीने चांगलीच घुसमट झाल्याचे कळते.
राज्यात स्वबळावर भाजपचे 30 ते 32 खासदार विजयी होण्याचा अंदाज अहवालात नोंदवलेला असला, तरी विद्यमान 11 खासदार धोक्यात असल्याची धक्कादायक माहितीदेखील असल्याचे फडणवीस यांनी सांगितल्याचा दावा सूत्रांनी केला. त्यामुळे 39 आमदार व 11 खासदार यांनी आतापासूनच स्वत:चे स्थान निश्चित राहावे, यासाठी जनतेत उतरून काम करावे; अन्यथा संबंधित मतदारसंघात पर्याय शोधावे लागतील, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात येते.