घाटकोपरमध्ये ट्रकच्या धडकेत पिता-पुत्राचा मृत्यू; संतप्त रहिवाशांचा रास्ता रोको
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/rasta-roko.jpg)
भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने घाटकोपरच्या लक्ष्मीनगर येथे बाप-लेकाचा मृत्यू झाला. हे रहिवाशांना समजताच त्यांनी ट्रक चालकाला चोप देत काही काळ रास्ता रोको केला.
मोहम्मद जुमिल बशीर सय्यद (वय ३५) आणि रजा मोहम्मद जमील सय्यद (वय ७) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. ते घाटकोपरच्या नित्यानंद नगर येथे राहत होते. गुरुवारी दुपारी घाटकोपर पश्चिम येथून ते दुचाकीवरून पंतनगरच्या दिशेने येत होते. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या परिसरातील रहिवाशांना अपघाताचे वृत्त कळताच त्यांनी मोठय़ा संख्येने घटनास्थळी धाव घेत ट्रक चालकाला पकडून बेदम चोप दिला. ट्रकची मोडतोड केली आणि दोन तास रस्ता रोखून ठेवला. त्यानंतर चालकाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या परिसरात अनेकदा अशा प्रकारचे अपघात होत असल्याने वाहतूक पोलीस तैनात करावेत,पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग तयार करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रहिवाशी करत आहेत. मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने याठिकाणी अपघात वाढतच आहेत, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.