देशातील सध्याच्या परिस्थितीची प्रत्येकाला लाज वाटायला हवी- नयनतारा सहगल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/nayantara_201901179800.jpg)
मुंबई – साहित्य संमेलनातील भाषणात मी सद्यस्थितीवर बोलणार होते. असहिष्णुता, हिंसाचाराच्या वातावरणावर भाष्य करणार होते. त्यामुळेच मला दिलेलं मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं निमंत्रण आयोजकांकडून रद्द करण्यात आलं असावं, असं प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांनी म्हटलं आहे. देशातील सध्याच्या परिस्थितीची लाज वाटायला हवी, असंदेखील त्या म्हणाल्या.
गोवंश, गोमांसावरुन होणाऱ्या हत्या, द्वेषाचं राजकारण, लेखकांचे-विचारवंतांचे खून याबद्दल प्रत्येक नागरिकाला लाज वाटायला हवी, असं मत सहगल यांनी व्यक्त केलं. ‘हा देश फक्त हिंदुंचा आहे, असं काहींना वाटतं. मात्र हा देश हिंदुस्तानातील प्रत्येकाचा आहे. गेल्या काही काळात अनेक विचारवंत आणि लेखकांच्या हत्या झाल्या. गौरी लंकेश, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांनी जीव गमावला. प्रख्यात व्यक्तींचे खून झाले. तर आपल्याला माहीत नसलेले अनेकजण जमावाकडून मारले गेले. गोमांस सापडल्याच्या संशयावरुन, गायींच्या तस्करीच्या अफवेवरुन हिंसाचार सुरू आहे. जमावाकडून खून पाडले जात आहेत. या हल्लेखोरांना सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद आहे. देशातील या परिस्थितीची भारतीय म्हणून लाज वाटायला हवी,’ अशी भावना सहगल यांनी व्यक्त केलं.