जालन्यात संभाजी भिडेंच्या कार्यक्रमात गोंधळ, पोलिसांचा लाठीमार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/bhide01.jpg)
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या जालना येथील कार्यक्रमात संभाजी ब्रिगेड आणि काही दलित संघटनांनी गोंधळ घातला आहे. जालन्यातील आर्य समाज मंदिरात संभाजी भिडे यांची बैठक होती. कार्यक्रमस्थळी विरोध करणारे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचे सांगण्यात येते. हा प्रकार आज (रविवार) आज सकाळी घडला.
गेल्या आठ दिवसांपासून शहरातील संभाजी भिडे यांच्या नियोजित कार्यक्रमाविषयी माहिती सोशल मीडियावरून फिरत होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेड आणि काही दलित संघटनांचा या कार्यक्रमाला कडाडून विरोध होता. सकाळी कार्यक्रमस्थळी या संघटना आल्या आणि त्यांनी भिडेंविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. घोषणाबाजी करणाऱ्या २० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गोंधळानंतर भिंडेचा नियोजित कार्यक्रम पार पडला. घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.