आयसिस मॉडयुलचे पाकिस्तान कनेक्शन, NIA चे मुख्यालय होते रडारवर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/is-modul.jpg)
राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिल्ली, उत्तर प्रदेशात छापेमारीची कारवाई करुन आयसिसच्या प्रेरणेने तयार होणारे दहशतवादाचे नवे मॉडयुल उधळून लावले. या दहशतवादी गटाची बांधणी करणारा मुख्य सूत्रधार पाकिस्तानी हस्तकांच्या संपर्कात होता अशी माहिती आता समोर आली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने बुधवारी दिल्ली आणि उत्तर प्रदेशात १६ ठिकाणी छापेमारीची कारवाई करुन शस्त्रास्त्र, दारुगोळयासह दहा जणांना अटक केली. या १० जणांपैकी चौघांनी नवी दिल्लीतील एनआयएचे मुख्यालय आत्मघातकी बॉम्बस्फोटात उडवून देण्याची योजना बनवली होती. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला अटक केलेल्या दहशतवाद्यांनी राजकारणी, सरकारी इमारती आणि दिल्ली एनसीआरमधल्या वर्दळीच्या भागांना लक्ष्य करण्याची योजना बनवल्याची माहिती दिली होती.
आमच्याकडे त्यांना अटक करण्यासाठी पुरेसे पुरावे होते असे एनआयएचे संचालक वाय.सी.मोदी यांनी सांगितले. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय सुद्धा यामध्ये सहभागी होती का? ते दहशतवाद्यांना मदत करत होते का ? त्या दिशेने आम्ही आता तपास सुरु केला आहे असे एनआयएने सांगितले.