आइसलँडमध्ये मोटार अपघातात महाराष्ट्रीय कुटुंबातील तिघांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Untitled-11.jpg)
ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या महाराष्ट्रीय कुटुंबातील तीन जण आइसलँडमधील अपघातात ठार झाले. त्यांचे एसयूव्ही वाहन गुरुवारी पुलावरून खाली कोसळले.
मृतांमध्ये दोन महिला व एका मुलाचा समावेश आहे. इतर चार जण गंभीर जखमी असून, त्यांना हेलिकॉप्टरने आइसलँडची राजधानी असलेल्या रेकजाविक येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये भारतीय वंशाचे दोन ब्रिटिश भाऊ व दोन मुलांचा समावेश आहे.
नॉर्डिक आयलंड येथे सुटीसाठी गेले असताना त्यांनी टोयोटा लँड क्रूझर भाडय़ाने घेतली होती. ती गाडी एकमार्गी पुलाच्या कठडय़ाला धडकून खाली कोसळली. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत लोक हे ब्रिटिश (मूळ भारतीय) असल्याचे समजले. त्यांची नावे समजली असली तरी वय माहीत नाही. भारतीय राजदूत टी. आर्मस्ट्राँग चँगसन यांनी लँडस्पिटाली रुग्णालयात जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. त्यांनी मृत व जखमींच्या भारतातील कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. त्यांचे आईवडील व भाऊ हे महाराष्ट्रातील असून ते आइसलँडमध्ये येत आहेत. त्यांचे मित्र लंडनहून रुग्णालयात दाखल झाले आहेत.
तिशीतील दोन जोडपी व तीन मुले (वये अंदाजे तीन, आठ व नऊ) हे सुटीसाठी गेले होते. त्यातील सर्वात तरुण मुलगी जागीच ठार झाली असून, एका मुलीवर शस्त्रक्रिया सुरू आहे. स्थानिक वृत्तानुसार मरण पावलेल्यात दोन भारतीय भावांच्या पत्नींचा समावेश आहे. दक्षिण आइसलँडचे पोलीस अधीक्षक स्वेइन क्रिस्टजेन रुनारसो यांनी सांगितले, की चार जण वाचले असून त्यांना रुग्णालयात नेले आहे. पर्यटन मार्गदर्शक अॅडॉल्फ एर्लिगसन हे पहिल्यांदा दोन पोलिसांसह घटनास्थळी गेले असून, तेथे कारचा चक्काचूर झालेला दिसला. आद्र्रतेमुळे रस्ता निसरडा झाला होता असे पोलिसांनी सांगितले. जेथे अपघात झाला तेथे तापमान गोठणबिंदूच्या खाली असून, स्थानिक प्रमाणवेळेनुसार साडेअकरा वाजता मोटार पुलाच्या कठडय़ास आदळून नुपसा नदीत कोसळली. पूल अरुंद असल्याने अपघात झाला असावा.