पंतप्रधान मोदींच्या सभेला जाणारी स्कूल बस उलटली; ३५ विद्यार्थी जखमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एका स्कूल बसला अपघात झाल्याचे वृत्त आहे. या बसमधील ३५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे.
कांगडातील लंज भागात एका कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला गुरुवारी सकाळी अपघात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धर्मशाळा येथील रॅलीत सहभागी होण्यासाठी ही बस विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. या अपघातात ३५ विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी घटनास्थळी प्रथमोपचाराची सोय नसल्याने या विद्यार्थ्यांना जमीनीवर झोपवूनच प्रथमोपचार देण्यात आले. त्यानंतर या विद्यार्थ्यांना लंजमधील सीएचसी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघातातील जखमी विद्यार्थी २० ते २४ या वयोगटातील आहेत. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, या अपघाताचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. पंतप्रधान गुरुवारी बारा वाजण्याच्या सुमारास धर्मशाळा येथे दाखल होणार आहेत. यावेळी भाजपाचे पदाधिकारी आणि सुमारे ५० लोक त्यांचे स्वागत करतील.
सभेच्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदी १२.३६च्या दरम्यान हिमाचलच्या जनतेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर सुमारे सव्वा एकच्या सुमारास ते पुन्हा दिल्लीकडे रवाना होतील, माध्यमातील वृत्तावरून कळते.





