‘साऊथ सेन्सेशन’ विजय देवरकोंडा रणवीरच्या चित्रपटातून करणार बॉलिवूड पदार्पण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Vijay-Devarakonda-.jpg)
काही दाक्षिणात्य कलाकारांचा चाहतावर्ग हा सर्वत्र पाहायला मिळतो. महेश बाबू, अल्लू अर्जुन यांच्यापाठोपाठ आता विजय देवरकोंडा हे नाव दाक्षिणात्य चित्रपट न पाहणाऱ्यांनाही ओळखीचा झाला आहे. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटानंतर अभिनेता विजय हा तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला. टॉलिवूडपासून बॉलिवूडचेही प्रेक्षक त्याच्या अभिनयाचे आणि स्टाइलचे दिवाने झाले. तर या साऊथ सेन्सेशनच्या चाहत्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. विजय देवरकोंडा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून अभिनेता रणवीर सिंगच्या चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी ही माहिती दिली आहे.
भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या ’83’ या चित्रपटात रणवीर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देवची भूमिका साकारणार आहे. तर विजय यामध्ये क्रिकेटर क्रिश श्रीकांत यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अर्जुन रेड्डी, गीता गोविंदम, टॅक्सीवाला अशा एकाहून एक दमदार तेलुगू चित्रपटात विजयने भूमिका साकारली आहे. त्याला बॉलिवूडमध्ये लाँच करण्यास अनेक दिग्दर्शक उत्सुक होते. यासगळ्यांत अखेर दिग्दर्शक कबीर खानने बाजी मारली.