Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
महानगरपालिका कर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/download-10.jpg)
पिंपरी (महा ई न्यूज) – महानगरपालिका कर्मचारी महासंघातर्फे थेरगाव येथील कैलास मंगल कार्यालयात शनिवारी (दि.15 ) दुपारी 3.30 वाजता कामगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या कामगार मेळाव्याचे उद्घाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष शशिकांत झिंजुर्डे यांनी दिली.
या मेळाव्यात श्रमिक आघाडी कामगार संघटनेच्या नेत्या मेधा थत्ते, महासंघाच्या सल्लागार ॲड. वैशाली सरीन मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, ॲड. गौतम चाबुकस्वार, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, मनपातील सर्व समित्यांचे अध्यक्ष व क्षेत्रिय समित्यांचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
झिंजुर्डे म्हणाले की, महापालिकेच्या आरोग्य, वैद्यकीय, विद्युत, सुरक्षा, शिक्षण मंडळ, क्रीडा, मुख्य कार्यालय, क्षेत्रिय कार्यालये, वायसीएम रुग्णालय आणि इतर रुग्णालये तसेच इतर सर्व विभागातील मानधन, कंत्राटी पध्दतीने काम करणारे सुमारे पाच हजारांहून जास्त कर्मचारी आहेत. या कर्मचा-यांना कायम कामगारांप्रमाणे समान काम समान वेतन मिळावे. कायम कामगारांप्रमाणे गणवेश व इतर साधने मिळावित, आठ तासांचे काम, साप्ताहिक सुटी, वैद्यकीय रजा, ओळख पत्र, ईएसआयची वैद्यकीय सेवा आदी सुविधा कायम कामगारांप्रमाणे मिळाव्यात. या कामगारांची ठेकेदारांमार्फत आर्थिक पिळवणूक केली जाते ती ताबडतोब थांबविण्यात यावी. या मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या या मेळाव्यात पुढील दिशा ठरविण्यासाठी सर्व कामगारांनी उपस्थित राहावे असे आवाहन बबन झिंजुर्डे यांनी केले आहे.