सरसंघचालक मोहन भागवतांना तुरुंगात टाकणार : प्रकाश आंबेडकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/1warispathan_ambedkar.jpg)
नागपूर – ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कायद्याला मानत नाही. सरसंघचालक मोहन भागवत खुलेआम ‘एके-47’सारख्या शस्त्रांची पूजा करतात. आमचे सरकार आले, की भागवतांना तुरुंगात पाठवू’, असे खळबळजनक वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी काल (गुरुवार) केले. ‘कॉंग्रेससोबत गेलो, तरीही एमआयएमला सोडणार नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वंचित बहुजन आघाडीच्या अधिवेशनामध्ये आंबेडकर यांनी हे वक्तव्य केले. या भाषणामध्ये आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. ‘केंद्र सरकार अर्थव्यवस्था मोडकळीस आणत आहे. रिझर्व्ह बॅंकेला इतिहासजमा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपामुळेच उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला’, असा आरोप त्यांनी केला. आगामी निवडणुकीमध्ये भाजपला दोन आकड्यांवर आणू, असा दावाही आंबेडकर यांनी केला.
‘अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी 12 वर्षांची शिक्षा आहे. सरसंघचालक भागवत खुलेआम शस्त्रांची पूजा करतात. आमची सत्ता आल्यानंतर त्यांना तुरुंगातच टाकू’, असे विधान आंबेडकर यांनी केले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटामध्ये अडकविण्याचा चुकीचा खेळ मोहन भागवत यांनी सुरू केला. आता या खेळाचा शेवट आता मीच करणार’, असा इशाराही आंबेडकर यांनी दिला.