राष्ट्रवादीचे कारभारी अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या संविधान सन्मान सोहळा
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी (दि. 11 डिसेंबर) संविधान सन्मान सोहळा व संविधान प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वागताध्यक्ष व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील व निमंत्रक माजी नगरसेवक ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी दिली आहे.
पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रशांत पगारे हे भुषविणार आहेत. तसेच, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड, ॲड. गोरक्ष लोखंडे हे मार्गदर्शन करणार आहेत.
त्याचबरोबर भगवान वैराट यांना ‘झोपडपट्टी रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यशदाचे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्या मातोश्री गिरजाबाई पंडीतराव जोगदंड, डॉ. अशोक शिलवंत यांच्या मातोश्री कमल तुळशीराम शिलवंत, पोलिस निरीक्षक कु. सिता वामन वाघमारे, काशीबाई दत्तात्रय गायकवाड आणि माजी समाज कल्याण आयुक्त आर. के. गायकवाड यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.